Join us

बँकांनी बदलली कर्ज देण्याची पद्धत, आता पगार नव्हे, तर 'या' निकषावर मिळणार कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:45 PM

जर आपण घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिता, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

नवी दिल्लीः जर आपण घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिता, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण काही सरकारी बँकांनी कर्ज देण्याची पद्धत बदलली आहे. बँक आता कर्ज देण्यासाठी पगाराची नव्हे, तर क्रेडिट स्कोअर विचारात घेणार आहेत. बँका नवं कर्ज देण्यासाठी क्रेडिट स्कोअरचा वापर करणार आहेत. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या गृहकर्जावर व्याजदर कमी होणार आहे. परंतु क्रेडिट स्कोअर खराब असल्यास गृहकर्जावरचा व्याजदरसुद्धा वाढणार आहे. 

  • या तीन बँकांनी केली सुरुवात 

बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँकेनं आपल्या ग्राहकांना क्रेडिट स्कोअरच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. या तीन बँका ग्राहकाला क्रेडिट स्कोअर स्लॅबच्या माध्यमातून कर्ज देणार आहेत. 

  • 1 टक्क्यानं स्वस्त मिळणार कर्ज

नव्या एक्सटर्नल बेंचमार्किंग व्यवस्थेंतर्गत बँक ऑफ बडोदा नवं कर्ज देताना सिबिल स्कोअरची मदत घेणार आहे. जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 900पैकी 760पेक्षा जास्त असल्यास त्यांना 8.1 टक्क्यांच्या व्याजानं कर्ज मिळणार आहे. तसेच 725पासून 759पर्यंत क्रेडिट स्कोअर असल्यास 8.35 टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार आहे. तसेच 675 ते 724 दरम्यान क्रेडिट स्कोअर असल्यास 9.1 टक्के व्याजानं कर्ज मिळणार आहे. अशातच ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कर्जाच्या व्याजदरांमध्ये 1 टक्क्याची कपात होऊ शकते.  आरबीआयनं बँकांना एक्सटर्नल बेंचमार्कच्या आधारावर क्रेडिट स्कोअर तपासून कर्ज देण्याचं सुचवलं आहे. आरबीआयकडूनही या निर्णयाला संमती मिळाल्यानं आता कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला क्रेडिट स्कोअर चांगला ठेवावा लागणार आहे. 

  • काय असतो क्रेडिट स्कोअर?

क्रेडिट स्कोअरला साध्या भाषेत सिबिल स्कोअर असं म्हणतात. ग्राहकाचा सिबिल स्कोअर क्रेडिट सूचना रिपोर्टच्या तीन अंकी संख्यात्मक सारांश आहे. जो गेल्या वेळच्या क्रेडिट व्यवहारावर आधारित असतो. याची मर्यादा 300 ते 900पर्यंत असते. स्कोअर जेवढा चांगला असतो, तेवढ्याच कमी व्याजानं कर्ज मिळतं.   

टॅग्स :पैसा