नवी दिल्ली : क्रेडिटविद्याने (creditVidya) फ्लिपकार्ट होलसेलच्या (flipkart wholesale) सहकार्याने 'आता खरेदी करा, नंतर पैसे द्या' (Buy now, pay later) ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ फ्लिपकार्ट होलसेलशी संबंधित जवळपास 1.5 लाख दुकानदार घेऊ शकतात. फ्लिपकार्ट होलसेलशी संबंधित छोट्या उद्योजकांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरेल. या योजनेच्या मदतीने ते कमी पैसे असतानाही अधिक वस्तू खरेदी करून त्यांची यादी वाढवू शकतील.
"आम्ही फ्लिपकार्ट होलसेलच्या सहकार्याने बीटूबी बीएनपीएल सोल्यूशन (B2B BNPL Solution) सुरू केले आहे. क्रेडिटविद्या या योजनेअंतर्गत एमएसएमईजला (MSMEs) विविध वित्तीय संस्थांकडून भांडवल मिळविण्यात मदत करेल. भारतातील लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश त्यांची विश्वासार्हता वाढवणे आणि त्यांचा खर्च आणि परिचालन खर्च कमी करून त्यांना सक्षम करणे हा आहे. या योजनेमुळे त्यांना वस्तू सहज मिळू शकतील आणि त्याचवेळी त्यांना भांडवल उभारणेही सोपे होणार आहे", असे क्रेडिटविद्याचे सह-संस्थापक आणि सीईओ आशिष अग्रवाल म्हणाले.
याचबरोबर, क्रेडिटविद्या आणि फ्लिपकार्टच्या या भागीदारीमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सहजतेने कर्ज मिळू शकेल आणि वेगाने वाढणारी आणि समृद्ध होणारी परिसंस्था निर्माण होईल. क्रेडिटविद्या आणि फ्लिपकार्ट होलसेलच्या टीमने एक सोपे आणि बहुभाषिक अॅप्लिकेशन तयार केले आहे, ज्यामुळे व्यवसायाशी संबंधित कामे करणे सोपे होईल. संपूर्ण प्रक्रियेला देखील कमी वेळ लागेल, असेही आशिष अग्रवाल यांनी सांगितले.
बिझनेस ऑनबोर्डिंगमध्ये एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल आणि 500 रुपयांपर्यंतची लहान रक्कम उधार स्वरुपात डिजिटद्वारे त्वरित उपलब्ध होईल. दरम्यान, फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले की, 'आता खरेदी करा, नंतर पैसे द्या' योजनेचा पारंपारिक पेमेंट मार्केटवर लक्षणीय परिणाम होईल आणि कर्ज देण्यास पर्याय म्हणून काम करेल. तसेच, फ्लिपकार्ट होलसेलशी संबंधित लहान उद्योजकांना ही योजना खूप आवडते कारण ही एक अतिशय सुलभ पेमेंट प्रणाली आहे. यामुळे त्यांच्याकडे रोख रक्कम कमी असली तरीही अधिक वस्तू खरेदी करून त्यांची यादी वाढवण्यास मदत होईल.