नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी गुगलने पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांना कपातीचा इशारा दिला आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहे की, कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना अनेक स्तरांवर नियुक्त केले जात असते. ते स्तर आता कमी केले जाणार आहेत. त्यामुळे कंपनीमध्ये आणखी कर्मचारी कपात केली जाऊ शकते. गुगलने याआधीच एक हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठ्या कंपनीने असा इशारा दिल्याने आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
मेमोमध्ये काय म्हटले आहे? गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेमोमध्ये म्हटले आहे की, महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. गुंतवणुकीची क्षमता वाढविण्यासाठीच आपल्याला हा कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. यात असेही स्पष्ट केले आहे की, मागील वर्षीप्रमाणे सर्वच विभागांना याचा फटका बसणार नाही. (वृत्तसंस्था)
ॲमेझॉनने केली होती कपात ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने ऑनलाइन ऑडियोबुक आणि पोडकास्ट सेवा देणाऱ्या ऑडिबल या कंपन्यांमध्ये ५% कर्मचारी कपात केली होती. ॲमेझॉनने व्हिडीओ स्ट्रिमिंग ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओ आणि एमजीएम स्टुडिओजमध्ये काही कर्मचाऱ्यांना कमी केले होते.
आता किती कर्मचारी उरले?मिंटच्या अहवालानुसार सप्टेंबर २०२३ पर्यंत गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेट या कंपनीकडे संपूर्ण जगभरात मिळून १,८२,३८१ कर्मचारी होते. कपातीआधी कंपनीमध्ये एकूण १,९०,७०० कर्मचारी होते.