नवी दिल्ली : केंद्र सरकारने स्टील आणि सिमेंटसारख्या कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यासाठी आवश्यक पावले न उचलल्यास बांधकाम प्रकल्प ठप्प पडण्याची भीती ४० टक्के विकासकांनी व्यक्त केली आहे. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.
बांधकाम क्षेत्रातील प्रमुख संस्था क्रेडाईने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. अहवाल प्रसिद्ध करताना क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया म्हणाले की, किमतीत वाढ झाल्यामुळे घरांच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढल्या असून त्यात आणखी ५ ते ७ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे घर घेण्याचा खर्च सुमारे १०-१५ टक्क्यांनी वाढणार आहे.
२९ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आणि यामध्ये १,८४९ लोकांची मते जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणानुसार, ३९ टक्के बांधकाम व्यावसायिकांनी दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर ते प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकणार नाहीत, असे म्हटले आहे.
मुंबईतील घरांच्या किमती आधीच ५ ते ८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. स्टीलच्या किमती गेल्या वर्षीच्या ४५ हजार रुपये प्रति मेट्रिक टनवरून आजपर्यंत ८९,००० रुपये रुपये प्रति मेट्रिक टनपर्यंत वाढल्या आहेत. - बोमन इराणी, नवनिर्वाचित अध्यक्ष, क्रेडाई
युद्धामुळे भडका
- गेल्या दोन वर्षांत बांधकाम कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे किमतीत आणखी भर पडली आहे.
- भारतीय बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर आहेत आणि त्यामुळे किमतीत आणखी वाढ झाली आहे.
- सध्या सिमेंटच्या गोणीची किंमत १०० पेक्षा अधिक रुपयांनी महाग झाली असून ५० रुपये किलोसाठी ४२० रुपये मोजावे लागत आहेत.
- वाढत्या उत्पादन खर्चामुळे सिमेंट कंपन्या सिमेंटच्या दरात आणखी ५० रुपयांची वाढ करणार असल्याने सिमेंट आणखी महागणार आहे.
ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती असून परवडणाऱ्या घरांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
- हर्षवर्धन पटोदिया, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई
७६% विकासकांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या किमती सध्याच्या पातळीपेक्षा कमी न झाल्यास ते केवळ सहा महिने त्यांचे प्रकल्प सुरू ठेवू शकतील.
स्टील - ₹८९,००० प्रति मेट्रिक टन
सिमेंट - ₹४२० -
मातीच्या विटा - ₹१५
खडी - ₹५,००० ब्रास
रेती (ब्रास) -₹९,०००
सिमेंट विटा - ₹३०
४०% विकासकांना बांधकाम बंद पडण्याची भिती वाटते.
१५% घर घेणाचा खर्च वाढणार