मुंबई : एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असताना विमान इंधनाने मात्र हवाई वाहतूक क्षेत्राला दिलासा दिला आहे. चालू महिन्यात ‘एअर टर्बाइन फ्यूएल’च्या दरात ६.३० टक्क्यांची घट झाली. त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात तिकीट दरवाढीचे संकट टळले आहे.
ऑक्टोबर २०२० पासून विमान इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यात प्रवासी क्षमता आणि विमान फेऱ्यांवर लागू केलेल्या मर्यादा, आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बधामुळे हवाई वाहतूक क्षेत्र तोट्यात आहे. विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने विमान तिकिटांवरील किमान मर्यादा वाढविली. त्यामुळे विमान प्रवास महागला. त्यात इंधन दरवाढीमुळे तिकिटांचे दर आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने विमान इंधनाचे दर कमी झाले. त्यामुळे तिकीट दरवाढीचे संकट तूर्तास टळले.
नोव्हेंबर महिन्यात विमान इंधनाचे दर ८१,०५० रुपये किलोलिटर इतके होते.
डिसेंबरमध्ये ते ७५,९४४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. चालू वर्षात ‘एटीएफ’च्या किमतीत ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतात विमान इंधनाचे दर वाढले की विमान कंपन्या परदेशातून एटीएफ आणण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे तिकीट दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. परंतु, कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू असल्याने हा मार्गही बंद झाला. त्यामुळे वाढीव खर्च प्रवाशांच्या माथी मारण्याखेरीज विमान कंपन्यांसमोर अन्य पर्याय राहिलेला नाही.
इंधन दरवाढीचा थेट तिकीट दरांवर परिणाम
एखाद्या मार्गावर विमानफेरी चालवायची झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चात विमान इंधनाचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक असतो. इतर खर्चात कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल, विमानतळावरील शुल्क समाविष्ट असते. परिणामी, विमान इंधन महागले की त्याचा थेट परिणाम तिकिटांवर होतो.
महिना किंमत (रुपयात)
जानेवारी ४९,०८४
फेब्रुवारी ५१,९००
मार्च ५७,५१९
एप्रिल ५६,४७९
मे ५९,८२२
जून ६२,२७९
जुलै ६८,०६४
ऑगस्ट ६७३८५
सप्टेंबर ६४७६२
ऑक्टोबर ७०,८८०
नोव्हेंबर ८१,०५०
डिसेंबर ७५,९४४