नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले खनिज तेलाचे दर आणि सातत्याने घसरत असलेल्या रुपयामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, देशातून होणाऱ्या वारेमाप तेलाच्या आयातीमुळे देश आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरत असलेली किंमत आणि वाढती व्यापारी तूट या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारमधील प्रमुख मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्याआधी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना गडकरींनी ही माहिती दिली. खनिज तेलाची आयात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतातील एकूण आवश्यकतेपैकी 80 टक्के खनिज तेल हे आयात केले जाते. त्यातच या वर्षाच्या सुरुवातीपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये 13 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे तेलाच्या आयातीवर होणारा खर्चही वाढला आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणाऱ्या वाढीमुळे पसिस्थिती अधिकच बिघडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 85 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचले आहेत. हा गेल्या चार वर्षांमधील प्रति बॅरल कच्च्या तेलाच्या किमतीचा हा सर्वोच्च स्तर आहे. दिवसेंदिवस कमकुवत होत असलेला रुपया, कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ. आणि आयएफ आणि एसएलची खराब झालेली स्थिती यामुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण होत आहे.
तेलाच्या वारेमाप आयातीमुळे देशासमोर गंभीर आर्थिक संकट - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 1:40 PM