गोकुळ सोनवणे
नाशिक : जागतिक मंदी नसताना आणि कंपनीकडे भरपूर आॅर्डर्स असतानाही बंद पडलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबरच या कंपनीवर अवलंबून असलेल्या सुमारे ११० वेंडर्सकडे (लघुउद्योग) काम करणाºया किमान दोन हजार कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अगोदरच मंदीचा सामना करीत असलेल्या उद्योग क्षेत्राला क्रॉम्प्टन ग्रिव्हजमुळे फटका बसला आहे.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतीत क्रॉम्प्टन ग्रिव्हज पॉवर सोल्युशन्स कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. संस्थापक ललित थापर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे पुतणे गौतम थापर यांच्याकडे सोपविली आहेत. गौतम थापर यांनी राबवलेली धोरणे चुकीची आणि घोटाळे करणारी असल्याने कंपनीची वाट लावल्याचा आरोप वेंडर्सनी केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कारखान्याचे उत्पादन बंद पडले आहे. मात्र कंपनीसाठी काम करणाºया नाशिकमधील ११० वेंडर्सचे (लघुउद्योगांचे) कंपनीकडे जवळपास २२५ कोटी रुपये अडकून पडले आहेत. ही कंपनी परस्पर विक्री केल्याचे समजल्यानंतर मात्र या वेंडर्सची पायाखालची वाळू सरकली आहे. या ११० लघुउद्योगांमध्ये जवळपास दोन ते अडीच हजार कामगार काम करीत आहेत. क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीकडे तीन महिन्यांपासून २२५ कोटी रुपये अडकून पडल्याने हे उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत.