Join us  

५०० रुपयांच्या कोट्यवधीच्या नोटा गायब? नेमकं काय झालं, अखेर RBIनं स्पष्टीकरण दिलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 12:02 PM

500 Hundred Rupees Note: रिझर्व्ह बँकेच्या प्रिंटींग प्रेसमध्ये छपाई झालेल्या हजारो कोटी मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा चलनात येण्यापूर्वीच गायब झाल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. या नोटांचं नेमकं काय झालं, याबाबत शंका कुशंका, तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या प्रिंटींग प्रेसमध्ये छपाई झालेल्या हजारो कोटी मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा चलनात येण्यापूर्वीच गायब झाल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. या नोटांचं नेमकं काय झालं, याबाबत शंका कुशंका, तर्कवितर्क लढवले जात होते.  दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेने या सर्वावर स्पष्टीकरण दिलं आहे.

सिस्टिममधून ८८ हजार ३२ कोटी रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याची बातमी खोटी आहे. प्रसारमाध्यमांमधील काही गटांनी प्रिंटिंग प्रेसमधून बँकेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे वृत्त दिले होते. ह्या बातम्या माहितीचा अधिकार काद्यांतर्गत प्रिंटिंग प्रेसमधून मिळवलेल्या माहितीची चुकीची व्याख्या करून प्रसारित करण्यात आल्या, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, प्रिंटिंग प्रेसमधून आरबीआयला पाठवलेल्या सर्व नोटांचा योग्य हिशोब ठेवला जातो. प्रेसमध्ये छापलेल्या आणि आरबीआयकडे पाठवलेल्या नोटांची योग्य तपासणी करण्याची भक्कम व्यवस्था आहे. त्यामध्ये उत्पादनाच्या देखरेखीसह नोटांच्या विवरणासाठी प्रोटोकॉलचा समावेश आहे. अशा प्रकरणांमध्ये आरबीआयकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवा, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेने जनतेला केलं आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या छापखान्यात छपाई झाल्यानंतर ५०० रुपयांच्या हजारो कोटी मूल्य असलेल्या नोटा गायब झाल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केले होते. या वृत्तामध्ये मनोरंजन रॉय यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या आकडेवारीचा हवाला देण्यात आला होता. यामध्ये ८८ हजार ३२ कोटी रुपये मूल्य असलेल्या  ५०० रुपयांच्या नोटा गायब आहेत, असा दावा करण्यात आला होता.

माहिती अधिकार कार्यकर्त्याने दावा केला होता की, एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ यादरम्यान, नाशिकच्या टांकसाळीत छापण्यात आलेल्या २१० मिलियन नोटा गायब आहेत. नाशिकच्या करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१६ यादरम्यान ५०० रुपयांच्या नव्या नोटांच्या ३७५.४५० दशलक्ष प्रती छापण्यात आल्या होत्या. मात्र आरबीआयच्या रेकॉर्डमध्ये केवळ ३४५ दशलक्ष नोटाच दिसत आहेत. या नोटा रघुराम राजन गव्हर्नर असताना आरबीआयला देण्यात आल्या होत्या.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दासव्यवसाय