Lokmat Money > बिझनेस न्यूज > खवय्यांची गर्दी; पण शेफ, वेटर्स आहेत कुठे?

खवय्यांची गर्दी; पण शेफ, वेटर्स आहेत कुठे?

Hotels: इतके दिवस बंद असलेली हॉटेलिंग इंडस्ट्री सुरू झाल्यानंतर या व्यवसायातील लोकांना खरंतर आनंद व्हावा, तसा तो त्यांना झालाही; पण एका नव्याच चिंतेनं त्यांना आता घेरलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:54 AM2021-05-28T05:54:08+5:302021-05-28T05:55:32+5:30

Hotels: इतके दिवस बंद असलेली हॉटेलिंग इंडस्ट्री सुरू झाल्यानंतर या व्यवसायातील लोकांना खरंतर आनंद व्हावा, तसा तो त्यांना झालाही; पण एका नव्याच चिंतेनं त्यांना आता घेरलं आहे.

Crowds of diners; But where are the chefs, the waiters? | खवय्यांची गर्दी; पण शेफ, वेटर्स आहेत कुठे?

खवय्यांची गर्दी; पण शेफ, वेटर्स आहेत कुठे?

आपल्याला हवी असणारी, आवडीची एखादी वस्तू, गोष्ट, खाद्यपदार्थ बरेच दिवस आपल्याला मिळाली नाही, की कसं अस्वस्थ होतं, हे आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे. त्यात तो पदार्थ म्हणजे खाण्यापिण्याची एखादी गोष्ट असेल, त्याची चटक लागली असेल, तर जी काय अस्वस्थता येते ती फक्त त्या खवय्यालाच माहीत! जगभरात सध्या सगळेच जण त्याचा अनुभव घेत आहेत. कोरोना आला आणि त्यानं लोकांना घरात नुसतं बंदच केलं नाही, तर त्यांच्या हिंडण्या-फिरण्यावर, खाण्यापिण्यावरही अनेक बंधनं आणली.  लॉकडाऊननं त्यांचे जेवढे ‘हाल’ केले तेवढे कोणीच केले नसतील! कोरोनामुळे  हॉटेलिंग आणि बाहेर खाण्यापिण्याची सवय असलेल्यांसाठी तर जणू आयुष्याचीच चव गेली! कोरोनामुळे ही इंडस्ट्री बंद ठेवण्याचा कालावधी वाढत गेला, तसतसे लोकही अधिकाधिक अस्वस्थ झाले. त्यामुळे तब्बल पाच महिन्यांनंतर ब्रिटनमध्ये जेव्हा रेस्टॉरण्ट, पब्ज, बार आणि इनडोअर सेवा सुरू झाल्या तेव्हा लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पब आणि बार्सच्या बाहेर तर मध्यरात्रीपासूनच लोकांनी रांगा लावल्या! (लॉकडाऊन काही काळ शिथिल झाल्यानंतर दारूच्या दुकानांबाहेर लागलेल्या रांगा, धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी अनेक शहरांत आपणही पाहिली!) 

इतके दिवस बंद असलेली हॉटेलिंग इंडस्ट्री सुरू झाल्यानंतर या व्यवसायातील लोकांना खरंतर आनंद व्हावा, तसा तो त्यांना झालाही; पण एका नव्याच चिंतेनं त्यांना आता घेरलं आहे. लोकांची वाढती मागणी आणि त्यांच्या जिभेला लागलेली चटक कशी पुरवायची या चिंतेनं त्यांची झोप उडाली आहे. ज्या पदार्थांबद्दल आणि चवीबद्दल, सेवेबद्दल ही हॉटेल्स प्रसिद्ध होती, तिथे पुरेसे आणि त्यांचे नेहमीचे नामांकित, लोकप्रिय शेफ, कर्मचारी आता राहिलेत कुठे? हॉटेल इंडस्ट्रीनं अनेकांना बेघर केलं आणि त्यांनीही मग पोटापाण्यासाठी दुसरा कामधंदा शोधला, बरेच जण गावी, काही तर आपापल्या देशांत निघून गेले.  

इंग्लंडमध्ये कोरोनामुळे तीन वेळा करण्यात आलेलं लॉकडाऊन  आणि त्याआधी ‘ब्रेक्झिट’मुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधल्या अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली. चांगले शेफ, बार टेंडर, वेटर, डायनिंग स्टाफ यातील अनेकांना आपली नोकरी तर गमवावी लागलीच; पण तातडीनं पोटापाण्याची दुसरी सोय बघण्याचीही वेळ आली. जे काही थोडेफार कर्मचारी टिकून होते, हॉटेल मालकांनी चांगल्या लोकांना थोडा कमी पगार देऊन का होईना, टिकवून ठेवलं होतं, तसा प्रयत्न केला होता, त्यातील अनेकांनीही या अनिश्चततेमुळे काही कालावधीनंतर स्वत:हूनच या नोकरीला रामराम ठोकला. इतके दिवस बंद असलेली ही इंडस्ट्री आता मात्र एका रात्रीतून पूर आल्यासारखी वाहू लागल्यामुळे या इंडस्ट्रीतील लोकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. लोकांची मागणी आणि आपला ब्रॅण्ड कसा टिकवून ठेवायचा, मोठ्या कष्टानं, महत्प्रयासानंतर स्वत:हून दारात आलेले हे ग्राहक नाराज झाले, तर ते पुन्हा कधीच आपल्या दारात पाय ठेवणार नाहीत, या भीतीनंही त्यांना चिंतातुर केलं आहे.
  
उत्तम सेवा आणि आतिथ्यशीलतेमुळे इंग्लंडमधील अनेक हॉटेल्स, बार्स खूप लोकप्रिय आहेत; पण आता त्याचीच कमतरता जाणवत असल्यामुळे अनेकांना घाम फुटला आहे. हॉटेल इंडस्ट्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, आमच्या क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे अनेक चांगले आणि अनुभवी कर्मचारी नोकरी सोडून गेले आहेत. लंडनमधील सर्वाधिक पुरातन आणि प्रसिद्ध रेस्टॉरण्टपैकी एक असलेल्या ‘पाइड अ टेर’चे संचालक डेव्हिड मूर म्हणतात, या क्षेत्रातील कुशल कामगारांची भीषण टंचाई आम्ही अनुभवतो आहोत. लंडनमध्ये त्यासाठी लोकच मिळत नाहीयेत. ब्रिटनमधील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री समूहाचे प्रमुख केट निकोलस यांच्या म्हणण्यानुसार, सरकारनं या कर्मचाऱ्यांसाठी ‘सुट्टीतही पगार’ ही योजना सुरू केली, या योजनेनंतर काही जण टिकून राहिले, तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सध्याच्या घडीला या इंडस्ट्रीमध्ये तब्बल साडेतीन लाख कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते आहे.  

मोठ्या ऑफर्स, ट्रेनिंग आणि जास्त पगार
ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये सूट दिली गेली. २१ जूनपर्यंत सर्व प्रकारची बंधनं शिथिल करण्याची त्यांची योजना आहे. लंडनमध्ये चाळीसपेक्षा जास्त रेस्टॉरण्ट‌्स समूहाचे ‘डी ॲण्ड डी’चे सीईओ देस गुणवर्धने म्हणतात, आम्हाला आत्ता या क्षणी किमान चारशे लोकांची गरज आहे; पण जास्त पगार देऊनही मुश्कीलीनं दीड-दोनशे कर्मचारीही मिळालेले नाहीत. ‘ब्रेक्झिट’नंतर सुमारे ५० हजार कर्मचारी ब्रिटन सोडून गेले, त्यातील तब्बल ३८ टक्के कर्मचारी हॉस्पिटॅलिटी उद्योगातील आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी काही हॉटेल्सचे संचालक आता नव्या लोकांना नव्यानं ट्रेनिंग, जास्त पगार आणि मोठ्या ऑफर्स देऊ करताहेत; पण तरीही कर्मचाऱ्यांचा नन्नाचा पाढा कायम आहे.

Web Title: Crowds of diners; But where are the chefs, the waiters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.