Join us

कच्चे तेल बारा वर्षांच्या नीचांकी पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 3:23 AM

अमेरिकेत कच्चे तेलाचा भाव ३१ डॉलर इतका खाली आला असून गेल्या बारा वर्षांतील हा सर्वात कमी दर आहे, तर दुसरीकडे तेलाच्या घसरत्या किमतीवर चर्चा करण्यासाठी तेल उत्पादक

अबुधाबी : अमेरिकेत कच्चे तेलाचा भाव ३१ डॉलर इतका खाली आला असून गेल्या बारा वर्षांतील हा सर्वात कमी दर आहे, तर दुसरीकडे तेलाच्या घसरत्या किमतीवर चर्चा करण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकची मार्चमध्ये तातडीची बैठक होणार आहे. ओपेकचे अध्यक्ष इमानूल इबे काचिकेवू यांनी सांगितले की, तेलाचे भाव ३५ डॉलर्सच्या खाली आल्यामुळे अशी बैठक आवश्यक झाली आहे. इमानूल नायजेरियाचे पेट्रोलियममंत्रीही आहेत. अबुधाबीच्या एनर्जी फोरममध्ये त्यांनी वरील माहिती दिली. तथापि ओपेकच्या इतर सदस्यांशी आपण अजून चर्चा केलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कमी मागणी, मजबूत झालेला डॉलर व वाढलेला पुरवठा यामुळे अमेरिकेत तेलाचे भाव ३१ डॉलर्सखाली गेले. बारा वर्षात प्रथमच इतका नीचांक कू्रड तेलाने नोंदला. तेलाचे भाव पडलेले असले तरी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाने स्थापन झालेल्या ओपेक देशांनी मात्र उत्पादन कपातीस नकार दिला आहे. भावामुळे प्रत्येक ओपेक देशाची पैशाची आवक घटली असली तरी बाजारातील आपला हिस्सा कमी करण्याची त्यांची तयारी नाही. हस्तक्षेप करण्यावर सदस्य देशांची मते भिन्न आहेत. ते म्हणाले की, एका गटाला वाटते ओपेकने हस्तक्षेप करावा, तर दुसऱ्या गटाचे मत आहे की, ओपेक देश ३० ते ३५ टक्केच तेल उत्पादन करतात. उर्वरित ६५ टक्के हिस्सा ओपेकेतर देशांमधून येतो. जोपर्यंत ६५ टक्के उत्पादन करणारे चर्चेस बसत नाहीत, तोपर्यंत भरीव काही हाती लागणार नाही. ‘एशियन ट्रेड टुडे’ ने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीत डिलेव्हरी मिळणारा यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट डब्ल्यूटीआय २.८ टक्के खाली गेला असून अमेरिकन क्रूड तेल ३०.५४ डॉलर्स झाले आहे. युरोपियन बेंचमार्क ब्रेन्ट ३.१ टक्के खाली येऊन भाव ३०.५७ डॉलर्स झाला आहे. यापूर्वी डिसेंबर २००३ मध्ये डब्ल्यूटीआय, तर एप्रिल २००४ मध्ये ब्रेन्टचा दर खूप घसरला होता. जगात सर्वात जास्त इंधन वापरणारा देश चीन असून तेथील अर्थव्यवस्था मंदीकडे झुकत चालली आहे.