Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्चे तेल २८ डॉलरवर

कच्चे तेल २८ डॉलरवर

आंतरारष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरण सुरूच असून सोमवारी तेलाच्या किमतीने प्रति बॅरल २७.६७ अमेरिकी डॉलरचा नीचांक गाठला आहे

By admin | Published: January 19, 2016 03:13 AM2016-01-19T03:13:51+5:302016-01-19T03:13:51+5:30

आंतरारष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरण सुरूच असून सोमवारी तेलाच्या किमतीने प्रति बॅरल २७.६७ अमेरिकी डॉलरचा नीचांक गाठला आहे

Crude oil at $ 28 | कच्चे तेल २८ डॉलरवर

कच्चे तेल २८ डॉलरवर

मुंबई : आंतरारष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरण सुरूच असून सोमवारी तेलाच्या किमतीने प्रति बॅरल २७.६७ अमेरिकी डॉलरचा नीचांक गाठला आहे. २००३ नंतर प्रथमच तेलाच्या किमतीने हा नीचांक गाठला आहे. यामुळे तेल उत्पादक देशांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. तेलाच्या किमतीमधील हा १३ वर्षांच्या नीचांक असला तरी अद्यापही या किमतीचे पडसाद बाजारातील इंधनात आणि पर्यायाने महागाई कमी होण्याच्या रुपाने प्रतिबिंबित झालेले नाहीत. तेलाच्या किमतीचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याने आता महागाई आटोक्यात येणारा का, याकडे जनेतेचे लक्ष लागले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी तेलाचे भाव १४५ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल इतके होते. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला होता. परंतु, तेलाच्या उत्पादनात स्वत:च्या देशाच्या पातळीवर आणि स्वत:ची गरज भागवून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची विक्री करण्याइतका अमेरिका हा देश स्वयंपूर्ण झाल्यामुळे तेलाच्या बाजाराच्या अर्थकारणाचा बाज पूर्णपणे बदलला आहे. त्यातच आता इराणवरील निर्बंध उठल्यानंतर आणि इराणने प्रति दिन पाच लाख बॅरल तेल उत्खनन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजारात अधिक पडझड अपेक्षित आहे.
दरम्यान, डॉलर आणि भारतीय रुपयांतील चलनदराच्या अनुषंगाने प्रति बॅरल किमती या दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. एका बॅरलमध्ये १५९ लीटर कच्चे तेल भरले जाते. एका बॅरलपासून सुमारे २७ लीटर पेट्रोल आणि ८५ लीटर डिझेल तयार होते. या सर्व घटकांचे त्रैराशिक मांडल्यास तेलाची किंमत प्रती लीटर १२ ते १४ रुपयांच्या दरम्यान येते. याच अनुषंगाने बाटलीबंद पाण्याचा विचार केला तर पाण्याच्या बाटलीची किंमत ही १२ ते १५ रुपयांच्या दरम्यान आहे.
इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासंदर्भातील निर्बंध उठल्यानंतर आता भारताने पुन्हा एकदा इराणकडून पूर्वीच्याच क्षमतेने तेल खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे. इराणकडून तेल खरेदी करण्यामागे भारताचा दुहेरी फायदा आहे. पहिला फायदा म्हणजे, तेलाच्या खरेदीचे पैसे चुकते करण्यासाठी इराणकडून ८० दिवसांचा कालावधी दिला जातो.
या तुलनेत सध्या ज्या देशांकडून भारत तेल खरेदी करतो, त्या देशांकडून केवळ ३० दिवसांचा कालावधी दिला जातो. तसेच, दुसरा मुद्दा म्हणजे, तेल उत्पादक देशांत इराणमधून मिळणारे कच्चे तेल हे लाईट क्रूड म्हणून ओळखले जाते. यावर प्रक्रिया करण्याचा खर्च कमी होतो, त्यामुळेच या तेलाला अधिक मागणी आहे.

 

Web Title: Crude oil at $ 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.