Join us  

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 114 डॉलरचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 4:08 PM

crude oil : ब्रेंट क्रूडच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111 डॉलर होती, जी आज 114 डॉलरवर पोहोचली.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाने (क्रूड ऑइल) पुन्हा एकदा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. युरोपीय संघाने रशियावर नवीन निर्बंध लादल्याने क्रूडच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे चीनच्या शांघाय शहरात औद्योगिक उपक्रम पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मागणी वाढणार आहे. फक्त क्रूडच नाही तर नैसर्गिक वायूच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूचा दर सध्या 14 वर्षांतील सर्वोच्च आहे.

ब्रेंट क्रूडच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111 डॉलर होती, जी आज 114 डॉलरवर पोहोचली. तेल उत्पादक देशांच्या संघटनेने (OPEC) उद्दिष्टानुसार उत्पादन सुरू ठेवले आहे, तर युरोपीय संघाने रशियावर नवीन निर्बंध लादल्याने पुरवठ्यात आणखी अडथळे निर्माण झाले आहेत. लिबियामध्ये क्रूड ऑइलच्या उत्पादनातही घट झाली आहे, तर चीन आपली बाजारपेठ पुन्हा उघडत आहे, त्यामुळे खप आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारातही पूर्ण वाव आहे, पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढू शकतात.

सीएनजी-पीएनजीही महागजागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूची किंमत 8 डॉलरपर्यंत पोहोचली आहे, जी 14 वर्षातील सर्वाधिक किंमत आहे. नैसर्गिक वायूच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ होत आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत नैसर्गिक वायूची किंमत 38 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे, साठा कमी होत आहे. अमेरिकेतील नैसर्गिक वायूचा साठा तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे, तर निर्यात 13 टक्क्यांनी वाढली आहे.

गव्हासह इतर शेतमालही तेजीत कृषी मालाच्या किमतींवर नजर टाकली तर गव्हाचे भाव चार आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. जागतिक बाजारात गव्हाची किंमत 1,130 डॉलर प्रति टनापर्यंत पोहोचली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे एप्रिलमध्ये गहू 12.50 टक्क्यांनी महाग झाला आहे. मक्याने 10 वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श केला असून त्याची किंमत 820 डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. युद्धाच्या संकटामुळे, काळ्या समुद्रातून होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर घटत्या पुरवठा आणि वाढत्या मागणीमुळे किंमती सतत वाढत आहेत.  तसेच, यावेळी उत्तर अमेरिकेत दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याने कृषी मालाच्या किमतीत आणखी वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेल