लंडन : अमेरिकेचे कच्च्या तेलाचे साठे वाढल्यामुळे गुरुवारी जागतिक बाजारात कच्चे तेल घसरले. ब्रेंट क्रूडचे दर ४५ सेंटने घसरून ७२.९१ डॉलर प्रतिबॅरल झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे दरही १० सेंटने घसरून ६७.८३ डॉलर प्रतिबॅरल झाले. इराणवर अमेरिकेकडून आणखी निर्बंध लादले जाण्याची शक्यता असल्यामुळेही तेलाच्या किमतीवर परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.आशियाई बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली-वर होतानादिसून आले. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात ते वाढल्याचे दिसून आले. अमेरिकी प्रशासनाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या तेलसाठ्यात ६.२ दशलक्ष बॅरलची वाढ झाली आहे.‘कॉमर्झ बँक’चे विश्लेषक कर्स्टन फ्रिश्च म्हणाले की, तेल बाजारात सध्या अनिश्चितस्थिती आहे. सौदी अरेबियाने आशियासाठी तेलाच्या किमतीत वाढ केल्याचा परिणाम दिसत आहे. आशियातून मागणी वाढेल असे संकेत त्यातून मिळतात. त्यात ओपेक देशांनीही तेल उत्पादन कमी केल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. सौदी अरेबियाची तेल कंपनी सौदी अॅरॅमकोने बुधवारी आशियाई बाजारासाठी अरब लाईट ग्रेड तेलाच्या किमती बॅरलमागे १.९० डॉलरने वाढविल्या आहेत. आॅगस्ट २०१४ नंतरची ही सर्वाधिक वाढ ठरली आहे.
जागतिक बाजारात कच्चे तेल उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 5:32 AM