आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतीत तेजी बघायला मिळत आहे. कच्च्या तेलाची किंमत दोन महिन्यांतील उच्चांकावर पोहोचली आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूड फ्युचर्स 118 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले होते. सध्या ते 117.30 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे.
युरोपियन युनियनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 117 डॉलर प्रती बॅरलच्याही पुढे गेली आहे. 28 मार्चनंतरचा हा सर्वाधिक दर आहे.
चीनमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आल्याने भाव वाढले-चीनमध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या बातम्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. खरे तर, चीनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यास कच्च्या तेलाची मागणीही वाढेल आणि पुरवठ्याअभावी किमती आणखी वाढू शकतात.
सामान्यांना बसू शकतो झटका!भारताच्या दृष्टीने कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ ही एक चिंतेची गोष्ट आहे. देशात, 22 मार्च ते 6 एप्रिल 2022 दरम्यान पेट्रोलडिझेल आधीच 10 रुपये प्रति लिटरने महागले आहे. पण, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलवर प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ व्हायला सुरुवात होऊ शकते. असे झाल्यास महागाईही वाढेल.