नवी दिल्ली : येत्या होळीच्या दिवशी देशवासीयांना महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याचे संकेत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव आणि युद्धाच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबर 2014 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमतीने प्रति बॅरल 97 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. आता लवकरच कच्च्या तेलाची किंमती प्रति बॅरल 100 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किंमत आणखी वाढणार
कच्च्या तेलाच्या किंमत आणखी वाढणार आहेत. नवीन वर्ष 2022 मध्ये क्रूड ऑयल किंमतीत 20 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून सातत्याने कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर इतकी होती. जी आता प्रति बॅरल 97 डॉलर इतकी झाली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून ते आतापर्यंत 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून 10 मार्चला निकाल लागणार आहेत. निवडणुकीत नुकसान होऊ नये म्हणून कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करत नसल्याचे मानले जात आहे.
कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात
निवडणुकीनंतर तोटा भरून काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्या निश्चितपणे दर वाढवतील. तसेच, कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनुसार, कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. Goldman Sachs ने म्हटले होते की, 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचू शकते आणि ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. तसेच, दुसरीकडे, JP Morgan ने सांगितले आहे की, 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 125 प्रति बॅरल इतकी होईल. तर 2023 मध्ये हीच किंमत 150 डॉलर प्रति बॅरल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.