नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढून प्रति बॅरल ७० डाॅलरच्या पुढे गेले असून, त्याचा परिणाम म्हणून भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी ब्रेंट क्रूडचे दर १.१४ डॉलरने वाढून ७०.४७ डॉलर प्रतिबॅरल झाले. त्याआधी शुक्रवारी ते २.६२ डॉलरने वाढले होते.
सौदी अरेबियाने रविवारी जाहीर केल्यानुसार, सौदीतील रास तनुरा तेल निर्यात सुविधेवर हाऊथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला, तसेच एक क्षेपणास्त्र डागले. जगातील सर्वांत मोठ्या तेल निर्यात सुविधेचे हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नसले तरी सौदी अरेबियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या सुरक्षेबाबत यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. कोरोना साथ उद्भवल्यानंतर प्रथमच कच्चे तेल ७० डॉलरच्या वर गेले आहे. तसेही कच्च्या तेलाचे दर ऑक्टोबरपासून वाढत आहेत. कच्चे तेल महागल्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार आहेत. नोव्हेंबरपासून पेट्रोलचे दर लिटरमागे १० रुपयांनी, तर डिझेलचे दर ११ रुपयांनी वाढले आहेत. भारताच्या काही शहरांत पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे. मागील ९ दिवसांपासून तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविलेले नाहीत. तथापि, कच्च्या तेलातील ताज्या दरवाढीनंतर पेट्राेल-डिझेलचे दर कंपन्यांना वाढवावेच लागतील.
भारतात पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर आहेत. पेट्रोलच्या मूळ किमतीच्या तुलनेत केंद्र आणि राज्य सरकारचे कर १६२ टक्के आहेत. डिझेलच्या मूळ किमतीच्या तुलनेत करांचे प्रमाण १२५ टक्के आहे. कर कपात केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो. तथापि, केंद्र सरकारने गेल्या महिन्यातच कर कपातीस नकार दिलेला आहे.