Join us

कच्च्या तेलाचे दर घसरल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 1:11 AM

इतिहासात कच्चे तेल ११ डॉलर प्रतिबॅरलपेक्षा कधीही घसरलेले नाही. १९९९ साली कच्चे तेल ११ डॉलर प्रतिबॅरल झाले होते.

- सोपान पांढरीपांडे नागपूर : न्यू यॉर्कच्या मर्कन्टाईल एक्स्चेंज (नायमेक्स) या बाजारामध्ये सोमवारी अमेरिकन कच्च्या तेलाचा दर उणे ३७ डॉलर प्रतिबॅरल (१५९ लिटर) झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे. याचे कारण इतिहासात कच्चे तेल ११ डॉलर प्रतिबॅरलपेक्षा कधीही घसरलेले नाही. १९९९ साली कच्चे तेल ११ डॉलर प्रतिबॅरल झाले होते.हे कसे घडले?जगात दोन प्रकारचे कच्चे तेल शुद्धीकरणासाठी वापरले जाते. ब्रेंट क्रूड व नायमेक्स क्रूड (याला अमेरिकन क्रूडही म्हणतात व त्यात (वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट, शेल गॅस व वेस्ट कॅनडियन सिलेक्ट) यांचा समावेश होतो. ब्रेंट क्रूडचा वायदा बाजार लंडन मेटल एक्स्चेंज तर नायमेक्सचा वायदे बाजार न्यू यॉर्कमध्ये आहे. ब्रेंट क्रूडपेक्षा नायमेक्सचा दर अंदाजे ९० टक्के असतो.डिसेंबर २०१९ मध्ये ब्रेंट क्रूड ५० ते ५५ डॉलर प्रतिबॅरल होते. त्याच महिन्यात चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला व नंतर ती साथ देशभर पसरली. ती रोखण्यासाठी ९० टक्के देशांमध्ये सध्या लॉकडाउन सुरू आहे. दुचाकी, चारचाकी, ट्रक, बसेस, रेल्वे, विमाने, जहाजे बंद आहेत. परिणामी कच्च्या तेलाची मागणी व खप ३० ते ३५ टक्क्यांनी घटला आहे.मे महिन्याचे सौदेडिसेंबरपासून कच्च्या तेलाच्या किमती ५५ डॉलरवरून ३० ते ३५ डॉलरपर्यंत आल्या होत्या. त्यामुळे दर कमी होण्याच्या आशेने सटोडीयांनी मे महिन्यात नायमेक्स कच्चे तेल २५ ते ३५ डॉलर होईल, असे सौदे केले होते. सौदे पूर्ण करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल म्हणजे आजची होती.सोमवारी (दि.२०) बाजार सुरू झाला तेव्हा किमती वाढण्याची कुठलीही शक्यता नव्हती, शिवाय साठवणूक क्षमता पूर्णत: संपलेली होती. त्यामुळे सौदा पूर्ण करून तेलाची डिलिव्हरी घेतली तर ते साठवायचे कुठे, हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे सटोडियांनी डिलेव्हरी घेण्याऐवजी भावातील फरक (डिफरन्स) स्वीकारून सौदे पूर्ण करायला सुरुवात केली. याचा परिणाम होऊन कच्च्या तेलाचे दर गडगडले व एकाचवेळी नायमेक्सचे भाव एक डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले व शेवटी डिफरन्स नफा देऊनसुद्धा सौदा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडूनच पैसे घ्या, असे म्हणायची वेळ सटोडियांवर आली. त्यामुळे नायमेक्स बाजारात सोमवारी कच्च्या तेलाचे दर उणे ३७ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत घसरले.पुन्हा अशी किंमत दिसणार नाही : जीम रॉजर्ससोमवारी अमेरिकेत कच्चा तेलाच्या किमतीमध्ये झालेली अभूतपूर्व घसरण आपल्याला पुन्हा बघावयास मिळण्याची शक्यता नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय तेल व्यापारातील अभ्यासक जीम रॉजर्स यांनी व्यक्त केले आहे. केवळ एखाद्या बातमीची प्रतिक्रिया म्हणून अशाप्रकारे बदल होऊ शकतो. युरोप तसेच मध्य पूर्वेत तेलाच्या किमती पिंपाला २० डॉलरच्या आसपास असून, अमेरिकेतही तसा बदल घडून येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कोरोनाने जगाचे अर्थशास्त्रच बदलून टाकले आहे. कमोडिटी बाजारात अशाप्रकारे किमतीमध्ये बदल झाला तर खरेदीदारालाच अधिक लाभ होतो. त्यामुळे तेलाचे मोठे खरेदीदार असलेल्या देशांना कमी झालेल्या दरांचा लाभ मिळणार आहे. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. बॅँकांनी अधिक चलन छापल्यास कमोडिटीमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात. चलनात रक्कम अधिक असल्यास सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते, असे मतही रॉजर्स यांनी व्यक्त केले.कच्च्या तेलाचा वापर कसा होतो?कच्च्या तेलाच्या किमती रोज कमी-जास्त होत असतात. जगभराच्या अनेक सटोडियांसाठी कच्चे तेल हे पैसा कमविण्याचे साधन आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे व्यवहार वायदे बाजारात होतात. यात भविष्यातील भावाचा अंदाज घेऊन सौदे केले जातात व पूर्ण केले जातात. हे सौदे कोट्यवधी बॅरल्स व कोट्यवधी डॉलर्सचे असतात. त्यात सटोडिया श्रीमंत होतात तसे भिकेलाही लागतात.यामुळे ब्रेंट कू्रडचे भावही कमी होतील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. जून महिन्याचे नायमेक्स कच्च्या तेलाचे सौदे २० डॉलर आणि जुलैचे सौदे २५ डॉलर प्रति बॅरलचे आधीच झाले आहेत. त्यातच कच्च्या तेलाच्या किमती पुढील तीन महिन्यात फारशा वाढणार नाहीत, असा अंदाज बांधायला हरकत नाही.कच्च्या तेलाची साठवण क्षमताजगभर दररोज अंदाजे ११० लक्ष बॅरल कच्चे तेल शुद्धीकरणासाठी वापरले जाते. सध्या ही मागणी ७० लक्ष बॅरलवर आली आहे. जगभर कच्च्या तेलाची साठवण क्षमता साधारणत: ४० ते ४५ दिवसांची म्हणजे ४५०० लक्ष बॅरल एवढी आहे. यात जमीन, समुद्रात उभे केलेले अजस्त्र टँक्स व क्रूडवाहू जहाजांचा समावेश आहे. सध्या कच्च्या तेलाची मागणी घटल्याने ही साठवण क्षमता पूर्ण भरली आहे व कच्चे तेल साठवण्याची क्षमताच शिल्लक नाही.

टॅग्स :खनिज तेल