Join us

Crude oil Rate: क्रूड ऑईलच्या बाजारात मोठी उलथापालथ; अरब राष्ट्रांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:59 PM

crude oil market Down: रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेने तेल उत्पादक देशांच्या संघटनेला (ओपेक) पुरवठा वाढवण्याची विनंती केली होती.

रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. या साऱ्या भीषण परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढू लागले होते. परंतू आज अशा काही घडामोडी घडल्या की कच्च्या तेलाच्या म्हणजेच क्रूड ऑईलच्या दरांत घसरण झाली आहे. यामुळे भारतात पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता धुसर दिसू लागली आहे. 

अमेरिकेच्या आवाहनानंतर संयुक्‍त अरब अमीरातने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज कच्च्या तेलाचे दणकून दर खाली आले आहेत. आज कच्च्या तेलाच्या बॅरलच्या दरात एकदम 16.84 डॉलरची घसरण झाली. यामुळे हे बॅरल 111.14 डॉलर वर आले आहे. ही घट २१ एप्रिल २०२० नंतरची सर्वाधिक आहे. अमेरिकेच्या कच्च्या तेलाचा देखील दर 15.44 डॉलरनी घसरून 108.70 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. 

रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेने तेल उत्पादक देशांच्या संघटनेला (ओपेक) पुरवठा वाढवण्याची विनंती केली होती. यावर वॉशिंग्टनमधील यूएईचे राजदूत युसूफ अल ओतैबा म्हणाले की, आम्ही उत्पादन वाढवण्याच्या बाजूने आहोत आणि संघटनेच्या इतर देशांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सौदी अरेबियानेही उत्पादन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

अमेरिकेच्या आवाजावर ओपेकचा सूर आठवडाभरात पूर्णपणे बदलला. काही दिवसांपूर्वी ओपेकने तेलाच्या किमती वाढण्याचे कारण कमी उत्पादन नसून भू-राजकीय तणाव असल्याचे सांगितले होते. तेव्हा ओपेक फक्त 4 लाख बॅरल प्रतिदिन उत्पादन वाढवण्यास तयार होते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे प्रमुख फतेह बिरोल म्हणाले की, आम्ही गरजेनुसार उत्पादन वाढविण्यास तयार आहोत. एजन्सीने गेल्या आठवड्यात बाजारात आपल्या साठ्यातून 60 दशलक्ष बॅरल तेल देण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :इंधन दरवाढयुक्रेन आणि रशियापेट्रोल