नवी दिल्ली: लंडनमध्ये जुलै 2017 नंतर पहिल्यांदाच खनिज तेलाचा दर प्रति बॅरल 50 डॉलरच्या खाली आला आहे. जगभरातील बाजारात झालेल्या घडामोडींमुळे खनिज तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेकसह इतर तेल उत्पादक देशांनी तेलाचं उत्पादन कमी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंधन दर भडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र सध्या या उलट घडताना दिसत आहे. अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादल्यानं ऑक्टोबरमध्ये इंधन दरानं उसळी घेतली होती. त्यामुळे इंधनाच्या दरांनी मागील चार वर्षांमधील उच्चांक नोंदवला. बुधवारी फ्युचर मार्केटमध्ये खनिज तेलाची किंमत 1.1 टक्क्यानं घसरली. त्याआधी सोमवारी खनिज तेलाचे दर 6.2 टक्क्यांनी घसरले होते. यानंतर रशियाचे उर्जामंत्री अलेक्झांडर नोवाक यांनी गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 'ओपेक आणि सहकारी देश तेलाच्या उत्पादनात घट करतील. त्यामुळे 2019 च्या पहिल्या सहा महिन्यात तेलाचे दर स्थिर होतील. जर परिस्थिती बदलली, तर तेल उत्पादक देश योग्य पावलं उचलतील,' अशा शब्दांमध्ये नोवाक यांनी गुंतवणूकदारांना विश्वास दिला होता. ऑक्टोबर महिन्यात खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात भडकले होते. त्यामुळे चार वर्षांपूर्वीचा इंधन तेलाच्या दराचा विक्रम मोडीत निघाला. मात्र त्यानंतर तेलाचे दर 40 टक्क्यांनी घटले. यानंतर ओपेक, रशिया आणि सहकारी देशांची 6 डिसेंबरला महत्त्वपूर्ण भेट झाली. यामध्ये तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तेलाचे दर पुन्हा भडकतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र गेल्या वर्षांमध्ये तेलाच्या उत्पादनात प्रचंड वाढ करणाऱ्या अमेरिकेनं ही भीती अयोग्य ठरवली.
खनिज तेलाच्या दरात मोठी घट; स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 7:21 PM