Cryptocurrency: गेल्या काही दिवसांपासून Cryptocurrency वर चर्चा सुरू होत्या. तसंच केंद्रानं खासगी क्रिप्टोकरन्सीवर निर्बंध घालण्याचेही संकेत दिले होते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी बिटकॉईन्सला (Bitcoin) मान्यता देण्याची कोणतीही योजना नसल्याचं एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. याशिवाय बिटकॉईन्सनं करण्यात येणाऱ्या ट्रान्झॅक्शन्सचा कोणताही डेटा ठेवत नसल्याचंही त्यांनी लिखित उत्तराद्वारे स्पष्ट केलं.
बिटकॉईन्सला मान्यता देण्याची सरकारची कोणती योजना आहे का? असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देण्यात आला होता. यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. तसंच बिटकॉईनच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये किती वाढ होत आहे यासंदर्भात सरकारला काही माहिती आहे का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यासंदर्भात उत्तर देताना त्यांनी सरकार बिटकॉईनद्वारे करण्यात येणाऱ्या ट्रान्झॅक्शनचा कोणताही डेटा ठेवत नसल्याचं म्हटलं.
क्रिप्टोकरन्सीवर विधेयक आणणार
क्रिप्टोकरन्सीवर निर्बंध आणण्यासाठी हिवाळी अधिवेशनात (Winter session of Parliament) Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill 2021 सरकार पारित करण्याच्या तयारीत आहे. तसंच याशिवाय यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे आपल्या डिजिटल करन्सी सुरू करण्याचीदेखील तरतूद आहे. दरम्यान, सरकार काही खासगी क्रिप्टोकरन्सीसवर निर्बंधदेखील घालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.