Join us

Cryptocurrency : क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवलेत...! 30 टक्के करावर आणखी एक भलामोठा कर लागणार; हातात काय उरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 1:25 PM

Cryptocurrency in GST: केंद्र सरकारने बजेटवेळी क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे आतापर्यंत लाखो रुपये कमावलेल्या भारतीय गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. परंतू, आताची ही अपडेट त्याहून मोठा धक्का देणारी आहे.

केंद्र सरकारने बजेटवेळी क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे आतापर्यंत लाखो रुपये कमावलेल्या भारतीय गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. परंतू, आताची ही अपडेट त्याहून मोठा धक्का देणारी आहे. कारण यावर २८ टक्के जीएसटीसह आणखी एक कर लावला जाणार आहे. असे झाल्यास तुमच्या हातात काय उरणार असा प्रश्न पडणार आहे. 

या महिन्य़ात जीएसटी काऊंसिलची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यांना देण्यात येणारी जीएसटी नुकसान भरपाई बंद करण्याची घोषणा केली जाऊ शकते. राज्यांना जी १४ टक्के जीएसटी वाढीची हमी दिली होती, ती पूर्ण झाली आहे. आता जीएसटी संकलनात २० टक्के वाढ झाली आहे. यामुळे केंद्र सरकार हा जीएसटी थकबाकीचा वादच संपविण्याच्या भूमिकेत आहे. असे असताना क्रिप्टो करन्सीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

क्रिप्टोच्या कमाईवर २८ टक्के जीएसटी लावण्यात यावा, अशा विचारात जीएसटी काऊन्सिल आहे. या डिजिटल करन्सीला लॉटरी, कॅसिनो, रेसकोर्स आणि जुगाराच्या रुपात पाहिले जाणार आहे. या कॅटेगरीमध्ये गेल्यास २८ टक्के जीएसटी लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही १०० रुपये कमावले तर त्यावर ३० टक्के आयकर, २८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. आयकरमध्ये 115BBH हे नवीन कलम जोडण्यात आले आहे. 

टीडीएसचीही टांगती तलवार...या ५८ टक्के करानंतर आणखी एक टक्का टीडीएस कापला जाण्याची टांगती तलवार या क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर असणार आहे. एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त व्यवहार झाला तर हा टीडीएस कापण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच याचे संकेत दिले आहेत. याचसोबत जर तुम्ही कोणाला क्रिप्टोकरन्सी गिफ्ट केली तरी देखील त्यावर कर आकारला जाणार आहे. म्हणजेच १०० रुपयांमागे ५९ रुपये कराचे द्यावे लागणार आहेत. उरलेल्या ४१ रुपयांसाठी या बेभरवशी करन्सीवर जोखीम पत्करावी लागणार आहे. 

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीमुख्य जीएसटी कार्यालयजीएसटीइन्कम टॅक्स