गुंतवणूकदारांना वेगवेगळे गुंतवणुकीचे मार्ग हवे असतात. जमीनजुमला, सोनेनाणे यापेक्षा वेगळा असा पर्याय गेल्या काही वर्षांत आला आहे तो म्हणजे क्रिप्टोकरन्सीचा. पण याचा मालक कोण असतो, कुठे असतो याची काहीच शाश्वती नसते कारण ती पूर्णत: डिजिटल असते. परंतू, याच क्रिप्टोकरन्सीने अनेकांना मालामाल बनविले आहे, यामुळे आपल्या देशात सध्या लीगल नसताना देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसा ओतणारे अमिताभ बच्चनपासून सोम्या गोम्यापर्यंत लाखो आहेत.
परंतू, क्रिप्टोबाजारही मोठा बेभरवशी आहे. गेल्या आठवडाभरात ९००० रुपयांना एक असलेला क्रिप्टोकॉईन एवढा तुटला आहे की थेट त्याची किंमत ५० पैसे झाली आहे. गेल्या २४ तासांत या क्रिप्टोकरन्सीची किंमत ९९.६६ टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे ४० अब्जांचे नुकसान झाले आहे.
क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा धडा असल्याचे मानले जात आहे. ही घसरण टेरा लूना या क्रिप्टोकरन्सीमध्ये झाली असून यामुळे भारतातील क्रिप्टो एक्स्चेंजनी लूनाला आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटविले आहे. नवीन गुंतवणूकदारांनी ही क्रिप्टोकरन्सी खरेदी करू नये म्हणून असे केले जाते. नवीन गुंतवणूकदार ही करन्सी वाढेल आणि आपल्याला बक्कळ पैसा मिळेल अशा आशेने ती खरेदी करतील. परंतू जियोटससारख्या प्लॅटफॉर्मवर अद्याप ही करन्सी उपलब्ध आहे.
जियोटसचे सीईओ विक्रम सुब्बुराज यांनी सांगितले की, परिस्थिती कधीही पालटू शकते. टेरा ब्लॉकचेन रिस्टार्ट झाली आणि लूना पूर्वपदावर आली तर असे होऊ शकते. परंतू असे होण्याची शक्यता खूप कमी आहे. गुंतवणूकदार ही करन्सी ज्या प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहे तिथे ते आधीच्या डिलिस्टेड झालेल्या प्लॅटफॉर्मवरून ट्रान्सफर करू शकतात.