Join us  

चालू आर्थिक वर्षात साेने, चांदीची आयात घटली; व्यापारी ताेटाही ४० टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 6:05 AM

भारत जगातील सर्वाधिक साेने आयात करणारा देश आहे. दागिन्यांची मागणी भारतात माेठ्या प्रमाणत असून दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते

नवी दिल्ली : मावळत्या आर्थिक वर्षात साेन्याची आयात ३.३ टक्क्यांनी घटली असून २६.११ अब्ज डाॅलर्स एवढी आयात झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २७ अब्ज डाॅलर्स एवढ्या मूल्याची आयात झाली हाेती. तसेच चांदीची आयातही ७० टक्क्यांनी घटली आहे. आयात घटल्यामुळे देशाचा व्यापारी ताेटा कमी हाेण्यास मदत झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये व्यापारी ताेटा सुमारे ४० टक्क्यांनी घटला आहे. 

भारत जगातील सर्वाधिक साेने आयात करणारा देश आहे. दागिन्यांची मागणी भारतात माेठ्या प्रमाणत असून दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते. फेब्रुवारीमध्ये मात्र आयात ५.३ अब्ज डाॅलर्सने वाढली आहे. सरकारने दागिन्यांच्या निर्यातीला प्राेत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करुन ७.५ टक्क्यांवर आणले आहे. तसेच २.५ टक्के कृषी अधिभार लावण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात रत्न व दागिन्यांची निर्यातही ३३.८६ टक्क्यांनी घटली असून २२.४० अब्ज डाॅलर्स एवढी निर्यात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात व्यापारी ताेटा ८४.६२ अब्ज डाॅलर्सपर्यंत घटला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात व्यापारी ताेटा १५१.३७ अब्ज डाॅलर्स हाेता. एप्रिल आणि फेब्रुवारीदरम्यान चांदीचीही आयातही ७० टक्क्यांनी घटून ७८ अब्ज डाॅलर्सवर आली आहे.

टॅग्स :सोनंचांदी