Join us

ग्राहकांना दिलासा! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 8:49 AM

तेल उत्पादक कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात सुधारणा करते

नवी दिल्ली - LPG Gas Price Update ( Marathi News ) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होताच एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात झाल्याचे दिसून येते. १ जानेवारी २०२४ रोजी राजधानी दिल्ली ते मुंबईपर्यंत LPG गॅस सिलेंडरचे दर कमी झालेत. तेल उत्पादक कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून काहिसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सिलेंडरच्या दरात १.५० ते ४.५० रुपयांपर्यंत कपात केली आहे. याआधी २२ डिसेंबरला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल केले नाहीत.

तेल उत्पादक कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात सुधारणा करते. २०२४ च्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू केले आहेत. यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात काही बदल करण्यात आलेत. तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या गॅस किंमतीत घट झाल्यानंतर आता मुंबईत १९ किलो वजनी सिलेंडर १७०८.५० रुपयांना मिळेल तर राजधानी दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर १७५५.५० रुपये इतके झाले आहेत. 

२२ डिसेंबरला झाली होती कपातयाआधी २२ डिसेंबरला तेल उत्पादक कंपन्यांनी १९ किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून ग्राहकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाची भेट दिली होती. त्यावेळी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात  ३९.५० रुपये कपात केली होती. 

घरगुती ग्राहकांना दिलासा नाही१४ किलोग्रॅम घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कंपन्यांनी कुठलेही बदल केले नाहीत. या गॅस सिलेंडरच्या दरात अखेरचे ३० ऑगस्ट २०२३ रोजी २०० रुपये कपात केली होती. त्यामुळे दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर ९०३ रुपये, कोलकाता ९२९ रुपये, मुंबई ९०२.५० रुपये तर चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये दराने मिळत आहे. 

टॅग्स :गॅस सिलेंडर