Join us  

ग्राहकांची पसंती पेट्रोल वाहनांनाच

By admin | Published: June 17, 2016 3:31 AM

प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये कडक पवित्रा घेतल्यानंतर आणि याची व्याप्ती वाढण्याच्या शक्यतेमुळे वाहनप्रेमींनी आपला मोर्चा पुन्हा एकदा पेट्रोल इंधनावर

मुंबई : प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये कडक पवित्रा घेतल्यानंतर आणि याची व्याप्ती वाढण्याच्या शक्यतेमुळे वाहनप्रेमींनी आपला मोर्चा पुन्हा एकदा पेट्रोल इंधनावर आधारित गाड्यांकडे वळवला असल्याचे दिसते. परिणामी, आता वाहन कंपन्यांनीही आपल्या धोरणामध्ये बदल करत, पुन्हा एकदा पेट्रोल इंधनावरील गाड्यांच्या मार्केटिंगवर जोर दिला आहे.पेट्रोलच्या तुलनेत डिझेल गाड्यांमुळे होणारे प्रदूषण जास्त असल्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रदूषणाची वाढती मात्रा रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेच याची दखल घेत, डिझेल इंधनावर जी वाहने चालतात व ज्यांची लांबी चार मीटरहून अधिक आहे आणि इंजिन क्षमता दीड हजार सीसीपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांवर नियमित करांसोबत अडीच टक्क्यांचा अतिरिक्त उपकर लावण्याचे आदेश दिले, तसेच लक्झरी श्रेणीत किंवा दोन हजार सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या गाड्यांवरही अतिरिक्त कर लावण्याचे आदेश देतानाच, डिझेल गाड्यांच्या आयुमर्यादेसंदर्भातही कडक धोरण अवलंबिण्याचे संकेत दिले. परिणामी, वाहनप्रेमींचा आता डिझेलच्या गाड्यांकडील ओढा कमी होताना दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल आणि मे २०१६ या दोन्ही महिन्यांच्या उपलब्ध आकडेवारीवरून डिझेल इंधनावर आधारित वाहनांच्या विक्रीमध्ये ४० टक्क्यांची कपात झाल्याचे दिसून आले आहे, तर याच तुलनेत गेल्या काही वर्षांपासून फारसा प्रतिसाद नसलेल्या पेट्रोल इंजिन आधारित वाहनांकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल इंजिनच्या गाड्यांच्या मागणीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. डिझेल गाड्यांसंदर्भात ग्राहकांच्या मागणीत झालेली ही लक्षणीय घट वाहन कंपन्यांनी नेमकेपणाने हेरली असून, या कंपन्यांनी आता पेट्रोलच्या गाड्यांच्या मार्केटिंगकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनाच्या किमतीचा गेल्या दशकाचा आढावा घेतला, तर या दोन्ही इंधनांच्या किमतीमध्ये सरासरी २२ रुपये अंतर होते, पण गेल्या पाच वर्षांपूर्वी या किमतीमधील तफावत घटत १४ रुपयांवर आली, तर गेल्या दोन वर्षांत हीच तफावत आता ११ रुपयांवर आली आहे. पेट्रोल इंधनावरील गाडीच्या तुलनेत डिझेल इंधनावरील गाड्यांच्या मेटेनन्सचा खर्च तुलनेने नेहमीच जास्त राहिलेला आहे. गेल्या काही वर्षांत त्यात वाढच होताना दिसत आहे. प्रदूषणासोबत वाढता मेन्टेनन्स हादेखील यातील कळीचा मुद्दा ठरला आहे. डिझेलवरून पेट्रोलच्या गाड्या असा ग्राहकांच्या मानसिकतेत झालेला बदल ही जवळपास गेल्या पंधरा वर्षांतील मोठी घटना असल्याचे वाहन कंपन्यांना वाटते. याचे कारण म्हणजे, गेल्या पंधरा वर्षांपासून इंधनातील किमतीच्या फरकामुळे ग्राहकांनी पेट्रोलच्या तुलनेत डिझेलला प्राधान्य दिले आहे. एवढेच नव्हे, तर काही उच्चतम इंजिन क्षमतेच्या गाड्यांची मॉडेल्स ही केवळ डिझेल पर्यायामध्येच तयार केली आहेत. (प्रतिनिधी)ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात होत असलेल्या बदलांचा वेध घेत, अनेक कंपन्यांनी आता सर्वच मॉडेल्स पेट्रोल इंधनाच्या पर्यायातदेखील उपलब्ध करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाहन खरेदीच्या प्राधान्य क्रमात झालेला हा बदल केवळ लहान अथवा वैयक्तिक वाहनांपुरताच मर्यादित आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या गाड्यांमध्ये असा ट्रेन्ड दिसून आलेला नाही. सीएनजीची मागणी वाढतेय, पण...एप्रिल आणि मे २०१६ या दोन्ही महिन्यांत डिझेल इंधनावर आधारित वाहनांच्या विक्रीमध्ये 40%कपात झाल्याचे दिसून आले आहे.सीएनजीच्या किमती पेट्रोल व डिझेल इंधनापेक्षा खूपच कमी आहेत. प्रदूषण न करणाऱ्या अशा सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. परंतु या इंधन पुरवठ्यासाठी अजूनही पंपांची वानवा असल्यामुळे या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या विक्रीने अपेक्षित वेग पडकलेला नाही. भविष्यात इंधन पुरवठ्याच्या वितरणात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन,कंपन्यांनी आपली नवीन व लोकप्रिय मॉडेल्स सीएनजी इंधनावरही सादर करण्यास सुरुवात केली आहे.