नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे, रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरांत कपात केली जाण्याची शक्यता मावळली आहे. २०१८ पर्यंत व्याजदर ‘जैसे थे’ स्थितीत राहतील, असे जाणकारांना वाटते. तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा दर वाढत आहे. याशिवाय सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, घरभाडे भत्त्यातील वाढ, यासारख्या इतरही काही बाबी महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत. पुढील वर्षी किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ४ ते ४.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. अपेक्षित ४ टक्क्यांपेक्षा हा आकडा जास्त आहे, असे औद्योगिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.व्याजदराबाबतचा कोणताही निर्णय घेताना, रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ क्षेत्रातील महागाईचा मुद्दा विचारात घेतला जातो. कारण किरकोळ क्षेत्रातील महागाईचा सामान्य लोकांशी थेट संबंध आहे. किरकोळ क्षेत्रातील महागाई २०१७ मध्ये १.४६ ते ४.८८ टक्के या दरम्यान राहिली. किरकोळ क्षेत्रातील महागाईच्या दरावर आधारित ग्राहक किंमत निर्देशांक जूनमध्ये १.४६ टक्क्यावर होता. नोव्हेंबरमध्ये मात्र, तो वाढून ४.८८ टक्क्यांवर गेला. हा ८ महिन्यांचा उच्चांक ठरला होता. रिझर्व्ह बँकेने मार्च २०१८ पर्यंतचा आपला महागाई अंदाज ४.२ ते ४.६ टक्के केला आहे. वास्तविक, सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई ४ टक्क्यांवर (२ टक्के अधिक-उणे) ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. घाऊक क्षेत्रातील महागाईचा दरही आॅक्टोबरमध्ये ३.९३ टक्क्यांवर गेला. अशा परिस्थितीत व्याजदर कपात केल्यास महागाईला प्रोत्साहनच मिळेल, असे जाणकारांनी सांगितले. येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांनी २०१८ मध्ये महागाईचा दर ४.७ टक्क्यांच्या दिशेने जाईल. त्यामुळे २०१८ मध्ये रिझर्व्ह बँक व्याजदर कपातीला दीर्घ काळ पूर्ण विराम देईल, असे दिसते.>दर वाढताचएसबीआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्य कांती घोष यांनी सांगितले की, महागाईचा दर वाढत आहे. तथापि, तो ५ टक्क्यांच्या आतच राहील. चालू वित्तवर्षात महागाईचा दर ३.५ ते ३.७ टक्के राहील. पुढील वर्षी तो ४.५ टक्के राहील. महागाईचा दर ५ टक्के झाला, तरी तो रिझर्व्ह बँकेच्या ४ ते ६ टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या आतच असेल. कच्च्या तेलाच्या किमती सध्या ६५ डॉलर प्रतिबॅरल आहेत. त्या वाढल्यास महागाई वाढू शकेल, अशा स्थितीत व्याजदर कपात अशक्य होईल.
कच्चे तेल महागल्यामुळे व्याजदर कपात अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 3:49 AM