Join us  

स्पाईसजेटच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:13 AM

या विषयावर सायबर तज्ज्ञांच्या संपर्कात आहोत’, असे स्पाईस जेटने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले

मुंबई : स्पाईस जेटच्या सर्व्हरवर मंगळवारी सायबर हल्ला झाल्यामुळे बुधवारी सकाळी काही विमान फेऱ्यांवर परिणाम झाला. कंपनीच्या तांत्रिक चमूने परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती स्पाईस जेटकडून देण्यात आली. ‘स्पाईस जेटच्या काही प्रणालींवर मंगळवार रात्री सायबर हल्ला (रॅन्समवेअर) झाला. त्यामुळे ऑपरेशन्सवर परिणाम झाला. विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे काही उड्डाणे उशिराने करावी लागली. रात्री संचालनास प्रतिबंध असलेल्या ठिकणच्या सेवा रद्द करण्यात आल्या. कंपनीच्या तांत्रिक टीमने परिस्थिती नियंत्रणात आणत समस्येचे निराकरण केले आहे. 

या विषयावर सायबर तज्ज्ञांच्या संपर्कात आहोत’, असे स्पाईस जेटने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. या घटनेमुळे प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. काही विमानतळांवर दोन ते तीन तास अडकून पडावे लागल्याने प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, स्पाईस जेटच्या ताफ्यात सध्या ९१ विमाने असून, त्यापैकी ४६ बोईंग-७३७, १३ मॅक्स आणि उर्वरित एटीआरसह अन्य प्रकारातील आहेत. किफायतशीर सेवा देणारी ही विमान कंपनी येत्या काळात ऑन फ्लाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात असून, अशाप्रकारे सायबर हल्ला होणे चिंतेची बाब असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :मुंबईस्पाइस जेट