cyber crime : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी नागरीकांच्या अक्षरशः नाकी नऊ आणले आहेत. रोज हजारो लोकांना कोट्यवधई रुपयांना गंडा घातला जात आहे. पोलीस व्यवस्थाही आता या गुन्हेगारांसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध ट्रॅप वापरुन सायबर गुंडांकडून लोकांची बँक खाती अवघ्या काही सेकंदात रिकामी केली जात आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग फेक कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होते. मात्र, आता सायबर ठगांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली आहे. सायबर घोटाळेबाज आता लोकांची फसवणूक करण्यासाठी लग्नपत्रिकेचा आधार घेत आहेत.
लग्नपत्रिकेचा ट्रॅप
आजकाल व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका पाठवण्याचा ट्रेंड झाला आहे. आता लोक घरी जाऊन लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी कार्ड देत नाहीत. ते व्हॉट्सअॅपवर किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईकांना लग्नाची पत्रिका पाठवतात. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने याच गोष्टीचा फायदा सायबर क्रिमिनल घेत आहेत.
APK फाईलद्वारे पाठवली जात आहे लग्नपत्रिका
सायबर ठग APK फाईलद्वारे व्हॉट्सअॅपवर लोकांना लग्नपत्रिका पाठवत आहेत. ही एपीके फाइल उघडताच तुमच्या मोबाईलचा सर्व डेटा सायबर ठग एक्सेस करतात. गुन्हेगारांना फोनचा एक्सेस मिळाल्यानंतर ते फोनवरून बँक माहिती किंवा ओटीपी चोरतात. याशिवाय ऑनलाइन व्यवहार करुन पैसेही ट्रान्सफर करुन घेतात.
या स्कॅमपासून कसं राहायचं सुरक्षित?
जर तुम्हाला तुमच्या फोनवर APK फाइलद्वारे लग्नाचे कार्ड मिळाले तर तुम्ही सावध व्हा. फोनमध्ये एपीके फाईल इन्स्टॉल असेल तर ती फाईल ताबडतोब डिलीट करा. जर तुम्हाला फोनवर काही संशयास्पद घडामोडी आढळल्यास डेटा बंद करा आणि तुमचे खाते फ्रीज करा.
कुठे करायची तक्रार?
तुमच्यासोबत जर सायबर गुन्हा घडला तर घाबरुन जाऊ नका. तुम्ही सर्वात आधी ऑनलाईन सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवू शकता. किंवा हेल्पलाईनवर फोन करुन माहिती देऊ शकता. तसेच तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊनही याबद्दल सविस्तर माहिती द्या. बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. लक्षात ठेवा गुन्हा घडल्यानंतर लवकरात लवकर तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.