Join us

सायबर चोरट्यांना लगाम, २४,२२९ मोबाइल केले बंद; दूरसंचार विभागाकडून धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 8:33 AM

एका वापरकर्त्याने या मोबाईल क्रमांकाबाबत तक्रार केली होती. या क्रमांकावरून विद्युत विभागाच्या नावे फोन येतात, असे तक्रारीत म्हटले होते.

नवी दिल्ली : देशातील वाढत्या सायबर फसवणुकीस लगाम घालण्यासाठी दूरसंचार विभागाने मोठी कारवाई करताना २४,२२९ मोबाईल क्रमांक निलंबित केले आहेत तसेच ४२ आयएमईआय ब्लॉक करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागाने ‘एक्स’वर ही माहिती दिली.

आपल्या पोस्टमध्ये दूरसंचार विभागाने म्हटले की, निलंबित करण्यात आलेले ३ मोबाईल क्रमांक तब्बल ४२ हँडसेटमध्ये वापरण्यात आल्याचे आढळून आले. एका वापरकर्त्याने या मोबाईल क्रमांकाबाबत तक्रार केली होती. या क्रमांकावरून विद्युत विभागाच्या नावे फोन येतात, असे तक्रारीत म्हटले होते.

६.८० लाख संशयास्पद क्रमांक शोधून काढले

दूरसंचार विभागाने म्हटले की, नागरिकांनी फसवणुकीची तक्रार चक्षू पोर्टलवर करावी. काही दिवसांपूर्वी विभागाने ६.८० लाख संशयास्पद मोबाईल क्रमांक शोधून काढले होते. हे बनावट असू शकतात किंवा बनावट आयडी कार्डच्या आधारे मिळविलेले असू शकतात किंवा नोंदणी एकाच्या नावे आणि वापर अन्य दुसऱ्यांद्वारे अशी स्थिती असू शकते.