Online Fraud : देशात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत चालली आहे. याची दखल आता खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. पीएम मोदी यांनी डिजिटल अरेस्टबाबत लोकांना आवाहन केलं आहे. राजधानी दिल्लीत एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या आयुष्याची जमापुंजी गमावली आहे. रामवीर सिंह चौधरी असे या ७३ वर्षीय पीडित आजोबांचे नाव आहे. रामवीर यांना एका अनोळखी नंबरवरुन एक कॉल आला होता. या कॉलच्या जाळ्यात अडकवून सायबर गुन्हेगाराने तब्बल १६ लाख रुपयांना गंडा घातला आहे. रामवीर यांच्या तक्रारीवरून द्वारका सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण, हा गुन्हा घडला कसा? हे समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्हीही अशा फ्रॉड कॉलमध्ये पैसे गमावू नये.
पीडित रामवीर सिंह चौधरी यांनी सांगितले की, त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. कॉलरने त्यांना त्यांचे मोबाइल सिम 4G वरून 5G वर अपग्रेड करायचे असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी फोन करणाऱ्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्याला कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही. मात्र, कॉल आल्यानंतर ३ दिवसांत त्यांच्या बँक खात्यातून १६ लाख ६४ हजार ३०० रुपये काढण्यात आले.
जेष्ठ नागरिक टार्गेटवर
देशाच्या राजधानीत अशा प्रकारच्या डिजिटल घोटाळ्यात ज्येष्ठ नागरीक बळी पडण्याची ही पहिलीच घटना नाही. या वर्षी जुलैमध्ये, दक्षिण दिल्लीतील सीआर पार्कमधील रहिवासी ७२ वर्षीय कृष्णा दासगुप्ता देखील अशाच एका घोटाळ्यात अडकले. ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी 'डिजिटल अरेस्ट' करुन त्यांच्या बँक खात्यांमधून ८३ लाख रुपये काढून घेतले. गेल्या वर्षी मुंबईत बनावट पोलीस असल्याचे भासवून एका ७२ वर्षीय वृद्धाला टार्गेट केलं. मलेशियामध्ये वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणात आपला सहभाग असल्याचा दावा करून फसवणूक करण्यात आली होती. या आधारे फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे उकळले.
न्यूड व्हिडीओ कॉल
मे महिन्यात एका वृद्ध व्यक्तीला अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला होता, ज्यामध्ये एक महिला अश्लील कृत्य करताना दिसली होती. वृद्धाने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला. पण, लगेच त्याला सायबर क्राइम डिव्हिजनच्या नावाने कॉल येऊ लागले. गुंडांनी स्क्रीनशॉट व्हायरल करून त्याला अटक करण्याची धमकी दिली. या भीतीने वृद्धाने ४७ हजार ७६ रुपये ठगांकडे ट्रान्सफर केले. अशा कॉल्सपासून सावध राहण्याचे आणि कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कशी टाळाल फसवणूक
- ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलवर लगेच विश्वास ठेवू नका.
- कुरिअर बॉय, बँक अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा कोणत्याही कंपनीचा एचआर म्हणून कॉल आला तरी खात्री पटल्याशिवाय माहिती देऊ नका.
- फोनवरील संदेशात येणाऱ्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा, ही लिंक बँक खाते रिकामी करू शकते.
- आजकाल अनेकजण पार्टटाईम नोकरीच्या आमिषाला बळी पडत आहेत. अशा फसवणुकीच्या मोहात पडू नका.