मुंबई - महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला. भाजीपाला आणि इंधन दरवाढीने गृहिणींचे किचनचे बजेट बिघडले असताना केंद्राने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या आहेत. पंतप्रधानांकडून राखी पौर्णिमेची ही भेट असल्याचंही भाजपा नेत्यांनी यावेळी म्हटलं. मात्र, दुसरीकडे दररोजच्या जेवणात असलेली तूर डाळ चांगलीच महागली आहे. दोन महिन्यात तूर डाळीच्या किंमतीत ३० ते ४० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. बाजारात तूर डाळीचे भाव १६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
राज्यात ऑगस्ट महिन्यात सर्वच डाळींच्या किंमती कडाडल्या आहेत. श्रावण महिन्यात तूर डाळ दर्जानुसार १५० ते १६५ किलो तर उडीद, मूग या डाळींनी शंभरी गाठली आहे. दरवाढीमुळे खिशाला भुर्दंड बसत असल्याने नागरिकामध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने मोठ्या कंपन्यांवर धाडी टाकून स्टॉक बाहेर आणावा, अशी नागरिकांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी तूर डाळ आणि हरभरा बाजार समितीत घालून पैसा रिकामा केला. मात्र, आता ह्या डाळींची साठेबाजी होत असून दरवाढीचे तेच प्रमुख कारण असल्याचं समजते. त्यामुळेच, मे महिन्यात १२० रुपयांवर असलेली डाळ आता १५० ते १६० रुपयांवर पोहोचली आहे.
गेल्या वर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. सद्यस्थितीत डाळीचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यंदा प्रारंभी मुसळधार पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळींवर निर्यात बंदी केली तरच दर कमी होतील, असे मत विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्याचे पीक घेतले जाते. राजस्थान व मध्य प्रदेशातून डाळींचा पुरवठा होतो. त्यानंतरही डाळी महागच आहेत. काही दिवसांपूर्वी दैनंदिन स्वयंपाकघरातील टॉमॅटोच्या किंमतींनी दरवाढीचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर, आता डाळीच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त झाला आहे.