Cyrus Mistry Road Accident, Anahita Pandole: रविवारचा दिवस भारतीय व्यापार क्षेत्रासाठी फारच वाईट दिवस ठरला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळ अचानक लक्झरी कार दुभाजकावर आदळली आणि कारमधील चार जणांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही कोणी सामान्य व्यक्ती नव्हती. ती व्यक्ती म्हणजे देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी असलेल्या शापूरजी पालोनजी समूहाशी संबंधित असलेले सायरस मिस्त्री होते. हे सायरस मिस्त्री एकेकाळी टाटा समूहाचे अध्यक्षही होते. त्यांच्यासोबत मृत्यूमुखी पडलेली दुसरी व्यक्ती म्हणजे त्यांचा जवळचा मित्र जहांगीर दिनशॉ पंडोले. याच कारमध्ये आणखी दोन लोकही होते. त्यापैकी एक होते डॅरियस पंडोले आणि दुसऱ्या होत्या अनाहिता पंडोले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार ड्राईव्ह करणाऱ्या अनाहिता पंडोले नक्की कोण आहेत, ते आपण जाणून घेऊया.
अनाहिता पंडोले चालवत होत्या कार!
अपघात झाला तेव्हा मर्सिडीज कार (एमएच 47 एबी 6705) गुजरातहून मुंबईकडे जात होती. सूर्या नदीच्या पुलावर येताच चारोटीजवळ दुभाजकाला कार धडकली. अनाहिता पंडोले कार चालवत असल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यासह त्यांचे पती डॅरियस पंडोले हेदेखील जखमी झाले. त्यानंतर या दोघांना रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पालघर पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाल्याचा प्रथमदर्शनी दिसते.
कोण आहेत अनाहिता पंडोले?
कार चालवणाऱ्या अनाहिता पंडोले या व्यवसायाने निष्णात डॉक्टर असून स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अनाहिता या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात काम करतात. अनाहिता या मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील आघाडीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ (gynaecologist) आहेत. याशिवाय, मरीन लाइन्स येथे होर्डिंग्जविरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अशीही त्यांची ओळख आहे. अनाहिता या त्यांचे पती डॅरियस यांच्यासमवेत कारमधून प्रवास करत होत्या. अनाहिता यांचे पती डॅरियस हे स्वत: जेएम फायनान्शियलच्या प्रायव्हेट इक्विटीचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, डॅरियस आणि अनाहिता यांना अपघातानंतर वापीच्या रेनबो हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या विविध बातम्यांनुसार, दोघांनाही अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. परंतु आता हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे.