उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं रविवारी दुपारच्या सुमारास अपघाती निधन झालं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. एक असा काळ होता जेव्हा सायरस मिस्त्री हे रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
२००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले. त्यानतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता.
का हटवलं होतं?
सायरस मिस्त्री यांना अचानक हटवल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. कारण जेव्हा सायरस मिस्त्री टाटा सन्सचे चेअरमन झाले, तेव्हा कंपनीचा व्यवसाय सुमारे १०० बिलियन डॉलर्स होता. त्यानंतर मिस्त्री यांच्याकडून २०२२ पर्यंत हा व्यवसाय ५०० बिलियन डॉलर्सवर नेण्याची अपेक्षा होती. पण अचानक टाटा सन्सच्या बोर्डाने सायरस मिस्त्री यांना २४ ऑक्टोबर २०१६ रोजी अध्यक्षपदावरून हटवले.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
टाटा बोर्डाने सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाची वाढ मंदावल्याचा आरोप केला होता आणि समूहाची वाढ अपेक्षित गतीने झाली नाही. परंतु मिस्त्री यांच्या वतीने NCALT मध्ये केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचे काम समूहाच्या काही प्रवर्तकांनी केले होते. त्यांच्या त्रासामुळए त्यांनी राजीनामा दिला होता. याचिकेच्या दुसऱ्या भागात समूह आणि रतन टाटा यांच्या अव्यवस्थित कारभारामुळे समूहाला मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
ज्यावेळी मिस्त्री यांना समुहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तेव्हापासून जवळपास वर्षभर त्यांचे रतन टाटा यांच्यासोबत संबंध चांगले होते. एक काळ असा होता जेव्हा ते मिस्त्रींना ट्रस्टमध्ये भूमिका देण्याचा विचार करत होते आणि मिस्री हे ट्रस्टचे उत्तराधिकारी बनतील असाही मार्ग तयार करण्याची त्यांना इच्छा होती.
यावर झाला वाद
काही अहवालांनुसार, सुरुवातीच्या वर्षात मिस्त्री सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर रतन टाटा यांचा सल्ला घेत असत. तथापि, वारशाने मिळालेल्या काही समस्यांना तोंड देण्यासाठी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. उदाहरणार्थ, टाटा नॅनो (कार व्यवसाय वाचवायचा असेल तर ती बंद केली पाहिजे असे मिस्त्रींचे मत होते), इंडियन हॉटेल्सकडून देश-विदेशातील महागडी खरेदी जी तोट्यात विकावी लागली, टाटा स्टील युकेच्या नुकसानीचा सामना करण्याची पद्धत, टाटा डोकोमोचा व्यवहार आणि अखेरीस इंडोनेशियातील टाटा पॉवरची खाण.
काही वृत्तांनुसार त्यांनी चार असे मोठे निर्णय घेतले आणि त्यामुळे विशेषकरून असंतोष निर्माण झाला. टाटा स्टील यूकेची विक्री, वेलस्पन एनर्जीचा नूतनीकरणयोग्य मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय, टाटा आणि त्याचे भागीदार डोकोमो यांच्यातील वाद आणि समूहाचे कर्ज कमी करण्यासाठी इतर जागतिक मालमत्ता विकण्याचे मिस्त्री यांचे प्रयत्न ही मुख्य कारणं असल्याचे म्हटले जाते.