ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - सायरस मिस्त्री यांना टाटा उद्योग समूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी हटवल्यानंतर कंपनीत होणा-या अफरातफरीचं खापर माझ्यावर फोडण्यात येणार होतं असा आरोप रतन टाटांनी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सायरस मिस्त्री कंपनीची संपत्ती विकण्याचा प्रयत्न करत होते असाही आरोप करण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ लागले होते. तसंच सायरस मिस्त्री वैयक्तिक पातळीवर रतन टाटांना टार्गेट करत असल्याचंही समोर येत होतं.
४८ वर्षीय मिस्त्री यांनी चार वर्षांपूर्वी ७८ वर्षीय रतन टाटा यांच्याकडूनच ‘टाटा सन्स’ या ‘टाटा समूहा’च्या होल्डिंग कंपनीच्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला होता. नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती. सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर अत्यंत नाट्यमयरित्या त्यांना चेअरमन पदावरुन हटवण्यात आलं. नव्या चेअरमनची निवड करण्यासाठी रतन टाटा यांच्यासह ५ जणांची सर्च टीम तयार करण्यात आली असून, नवा चेअरमन मिळेपर्यंत चार वर्षांनी पुन्हा एकदा रतन टाटा यांनी समूहाची धुरा आपल्या हाती घेतली. बोर्डाच्या निर्णयाला सायरस मिस्त्री न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार टेलीकम्युनिकेशन कंपनी एनटीटी डोकोमोसोबत न्यायालयीन लढाईत झालेला पराभव हा सायरस मिस्त्रांविरोधातील निर्णयाचा टर्निंग पॉईंट ठरला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने टाटाला आदेश दिला होता की, 1.17 अब्ज डॉलर नुकसान भरपाई डोकोमोला देण्यात यावी. सायरस मिस्त्री डोकोमो प्रकरणाचं खापर रतन टाटांच्या माथी फोडणार होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
ग्रुपच्या काही संपत्ती विकण्याच्या सायरस मिस्त्रींच्या निर्णयामुळे रतन टाटा चिंतीत होते. तसंच सायरस मिस्त्रींच्या कामकाजाच्या पद्धतीवरही ते नाराज होते आणि त्यावर टीकाही केली होती. युकेमधील टाटा स्टील युनिट ज्याचा व्यवहार स्वत: रतन टाटांनी केला होता तो विकण्याचा निर्णय हादेखील या निर्णयात टर्निग पॉईंट ठरल्याचं सूत्रांकडून कळलं आहे.
सोबतच ग्रुपने 2008 मध्ये संपादित केलेल्या जगुआर लँड रोव्हरसाठी कोणतीही गुंतवणूक आणण्यास तसंच त्याची वाढ करण्यातही सायरस मिस्त्री अपयशी ठरले. रतन टाटा यांनी युकेमध्ये कंपनीची एक प्रतिमा तयार केली होती, मात्र जे काही रतन टाटांनी मिळवलं होतं ते सर्व सायरस मिस्त्रींमुळे गमवावं लागल्याचा आरोप केल्याचंही सूत्रांकडून कळलं आहे.
याशिवाय शिकागोमधील ग्रूपच्या हॉटेलची विक्री आणि न्यूयॉर्कमधील हॉटेलच्या विक्रीचा प्रयत्न करण्याचा निर्णयदेखील कंपनीला नापसंद होता.