Dabur-Badshah Masala: भारतात मसाल्यांचे क्षेत्र प्रचंड मोठे आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतात मसल्यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो आहे. यातच आता मसाले कंपन्यांमध्ये महत्त्वाची घडामोड घडली आहे. FMCG प्रमुख डाबर इंडियाने देशातील २५ हजार कोटी रुपयांच्या मसाला बाजारात प्रवेश केला आहे. डाबर इंडियाने बादशाह मसाला या मसाल्यांच्या कंपनीत ५१ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. कराराच्या अनुषंगाने डाबरने बादशाह मसालाच्या इक्विटी समभागांमध्ये ५१ टक्क्यांचे बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले आहे, असे जाहीर केले.
या करारानंतर आता डाबर कंपनीला ५१ टक्के समभागांसह बादशाह स्पाइसेसमध्ये मालकी हक्कही मिळाले आहेत. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात डाबरने बादशाह मसाल्याचे भागभांडवल विकत घेण्याची घोषणा केली होती. तेव्हा डाबरने बादशाह मसालामधील ५१ टक्के हिस्सा ५८७.५२ कोटी रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले होते. एका संयुक्त निवेदनात डाबरने बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील ५१ टक्के भागभांडवल विकत घेण्यासाठी निश्चित करार केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
बादशाह मसाल्याची मालकी आता डाबर कंपनीकडे
आता हा करार पूर्ण झाल्यानंतर डाबर इंडिया बादशाह मसाल्याची मालक बनली आहे. डाबर इंडियाने शेअर बाजाराला याबाबत माहिती देत म्हटले की, हे अधिग्रहण अन्न क्षेत्रातील नवीन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या कंपनीच्या धोरणात्मक इराद्याशी सुसंगत आहे. डाबर इंडियाने सांगितले होते की, ५१ टक्के इक्विटी स्टेकसाठी ५८७.५२ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या करारासाठी बादशाह मसाल्याची किंमत १,१५२ कोटी रुपये होती. उर्वरित ४९ टक्के भागभांडवल पुढील ५ वर्षांनी विकत घेतले जाईल, असे कंपनीने सांगितले होते.
असा होता बादशाह मसाल्यांचा प्रवास
बादशाह मसाल्याची १९५८ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी जवाहरलाल जमनादास झवेरी यांनी सायकलवर गरम मसाला आणि चाय मसाला विकायला सुरुवात केली. हा मसाला त्वरीत लोकप्रिय झाला आणि जवाहरलाल जमनादास यांनी घाटकोपर, मुंबई येथे एक लहान युनिट स्थापन केले. यानंतर गुजरातमधील उंबरगाव येथे ६,००० चौरस फुटांचा मोठा कारखाना स्थापन करण्यात आला. कंपनीने पावभाजी मसाला, चाट मसाला आणि चना मसाला सादर करत आपला विस्तार केला. जवाहरलाल जमनादास यांनी १९९६ पर्यंत हा व्यवसाय यशस्वीपणे चालवला, पण त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचा मुलगा हेमंत याने कारभार सांभाळला.
दरम्यान, या अधिग्रहणामुळे डाबर इंडियाचा फूड बिझनेस ३ वर्षांत ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार डाबर इंडियाच्या एकत्रित नफ्यात वार्षिक आधारावर २.८५ टक्क्यांची घट नोंदवली गेली. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा ४९०.८६ कोटी रुपये होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"