नवी दिल्ली : डाळींच्या दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आलेले असताना आता चार राज्य सरकारांकडून किमान दरात डाळ विक्री सुरू झाली आहे. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांनी १२० ते १४५ रुपये प्रति किलो दराने डाळ विक्री सुरू केली आहे.आंध्र प्रदेशात आणि तेलंगणात रेशन दुकानांवर डाळ प्रति किलो ५० रुपयांनी उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर तामिळनाडूत सरकारने उडीद डाळ सर्वांसाठीच ३० रुपये किलोने देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे तूर डाळींच्या किमती प्रचंड वाढलेल्या असताना या राज्यात मात्र आता सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.गुजरातमध्ये किरकोळमध्ये तूर डाळ १४० रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. गुजरातमधील मिल मालकांनी यासाठी तयारी दर्शविली आहे. ठोक विक्रेते १३५ रुपये किलोने तूर डाळ विक्रीसाठी बाजारपेठेत देणार आहेत. ठोक विक्रेते डाळींवर एक टक्का कमिशन घेणार आहेत. तर छत्तीसगढमध्ये १२० ते १४० रुपये प्रति किलोने तूरडाळीची विक्री होत आहे. छत्तीसगढमधील १७ जिल्ह्यात १५० ठिकाणी ही डाळ विक्री होत आहे. उत्तराखंडमध्ये १४५ रुपये किलोने तूरडाळ उपलब्ध करून दिली जात आहे. हिमाचल प्रदेशात हरभरा डाळ आणि मसूर डाळ ४० ते ५० रुपये किलोने विक्री केली जात आहे.
चार राज्यांत किमान दरात डाळ विक्री
By admin | Published: October 26, 2015 11:28 PM