Join us

आता 'या' कंपनीचे सिमेंट बाजारात विकले जाणार नाही; कर्ज फेडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 6:01 PM

Dalmia Bharat: जयप्रकाश असोसिएट्स लि. (JAL) ने आपला उर्वरित सिमेंट व्यवसाय दालमिया समूहाला विकण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : जेपी सिमेंट (Jaypee Cement), बुलंद (Buland),  मास्टर बिल्डर (Master Builder) आणि बुनियाद (Buniyad) सिमेंट ही सिमेंट व्यवसायाशी संबंधित नावे तुम्ही ऐकली असतीलच. जरी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे सर्व जयप्रकाश असोसिएट्स लि. (JAL) सिमेंट ब्रँड आहे. एक काळ असा होता जेव्हा सिमेंट मार्केटवर जेपी सिमेंटचे वर्चस्व होते. पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली आणि हे ब्रँड हळूहळू बाजारातून बाहेर पडले. आता जयप्रकाश असोसिएट्स लि. (JAL) आणि या समूहाच्या इतर कंपन्यांनीही त्यांच्या सिमेंट व्यवसायातील उर्वरित भाग विकला आहे.

जयप्रकाश असोसिएट्स लि. (JAL) ने आपला उर्वरित सिमेंट व्यवसाय दालमिया समूहाला विकण्याची घोषणा केली आहे. हा करार दोन्ही समूहांमध्ये 5,666 कोटी रुपयांना झाला आहे. कर्ज कमी करण्यासाठी उचललेले हे पाऊल जेपी समूहाने सिमेंट व्यवसायातून पूर्णपणे माघार घेतली आहे. या करारांतर्गत, जेपी समूहाची प्रमुख कंपनी जयप्रकाश असोसिएट्स लि.  (JAL) आणि तिच्या संलग्न कंपनीकडून दालमिया भारत लिमिटेड विविध राज्यांमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्प घेणार आहे, ज्यामध्ये वार्षिक 94 लाख टन सिमेंट क्षमता आहे.

याचबरोबर, दालमिया भारत लिमिटेडची सिमेंट उत्पादन मर्यादा सध्याच्या 3.59  कोटी टनांवरून वाढून 4.53 कोटी टन होईल. यासोबतच दालमिया समूहाची उपस्थिती मध्य भारतातही असणार आहे. दालमिया भारत लिमिटेडच्यावतीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, उपकंपनी दालमिया सिमेंट भारत लिमिटेड (DCBL) ने जयप्रकाश असोसिएट्स लि.  (JAL) आणि त्यांच्या संलग्न कंपन्या क्लिंकर, सिमेंट आणि पॉवर प्लांट्सच्या अधिग्रहणासंबंधी करार करण्यात आला आहे.

या करारामध्ये 94 लाख टन वार्षिक क्षमतेचे सिमेंट युनिट, 67 लाख टन क्लिंकर क्षमता आणि 280 मेगावॅट क्षमतेचे थर्मल पॉवर प्लांट यांचा समावेश आहे. दालमिया भारत लिमिटेडने सांगितले की, "या मालमत्ता मध्यप्रदेश, यूपी आणि छत्तीसगडमध्ये आहेत." तसेच, या करारामुळे दालमिया समूहाला देशाच्या मध्यवर्ती भागात आपली उपस्थिती वाढण्यास मदत होणार आहे. आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 7.5 कोटी टन आणि 2030-31 पर्यंत 11 ते 13 कोटी टन क्षमतेची सिमेंट कंपनी बनण्याचे कंपनीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

टॅग्स :व्यवसाय