Join us  

डाटा दलालीचा सुळसुळाट!

By admin | Published: March 23, 2017 12:43 AM

काही ‘डाटा दलाल’ (डाटा ब्रोकर्स) नागरिकांची खासगी माहिती कंपन्यांना विकीत असल्याचा अत्यंत गंभीर मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला.

नवी दिल्ली : काही ‘डाटा दलाल’ (डाटा ब्रोकर्स) नागरिकांची खासगी माहिती कंपन्यांना विकीत असल्याचा अत्यंत गंभीर मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. त्याची सरकारने दखलही घेतली.समाजवादी पार्टीचे सदस्य संजय सेठ यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, दलालांकडून विकत घेतलेल्या डाटाच्या आधारे अनेक कंपन्या नागरिकांना फोन करून कर्ज देऊ करीत आहेत. इतरही अनेक योजना त्यांच्यासमोर सादर करीत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सरकारने दखल घ्यावी तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलावीत. सपाचे सदस्य नरेश अग्रवाल यांनी सांगितले की, मला स्वत:लाच असे फोन आले. माझी वैयक्तिक माहिती आणि फोन क्रमांक आपणास कोठून मिळाले याची विचारणा केली असता कोणीही ती माहिती दिली नाही. नरेश अग्रवाल यांनी हॅकिंगचा मुद्दाही उपस्थित केला. या माध्यमातून अनेक देशांत घोटाळे झाल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)