लोकप्रिय भारतीय स्टार्ट-अप आणि ऑडिओ उत्पादन निर्मिती कंपनी boAt शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बोटच्या ७.५ मिलियनहून अधिक ग्राहकांच्या वैयक्तिक डेटाचा लीक झालाय. बोटच्या युझर्सची नावं, पत्ता, नंबर, ईमेल आयडी आणि ग्राहक आयडी यासारखे महत्त्वाचे तपशील डार्क वेबवर लीक झाले आहेत. हा जवळपास २ जीबीचा डेटा असल्याचा खुलासा एका हॅकरनं केलाय. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, ५ एप्रिल रोजी ShopifyGUY नावाच्या हॅकरनं या लीकचा दावा केला होता.
धोके काय आहेत?
तज्ज्ञ अशा डेटा लिकच्या गंभीर परिणामांवर जोर देतात. त्याचा प्रभाव वैयक्तिक डेटा अनेकापर्यंत जाऊ शकतो. यासोबत आर्थिक फसवणूक होण्याचा धोकाही आहे. दुसरीकडे, जर आपण डार्क वेबबद्दल बोललो, तर ते केवल TOR नेटवर्कद्वारे अॅक्सेस केले जाऊ शकतो. इंटरनेटचा हा हिस्सा अनेकदा सायबर गुन्हेगारांना होस्ट करतो. येथे हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार चोरी केलेला डेटा विकू शकतात. याआधीही भारतात अशी प्रकरणं समोर आली आहेत, जी डार्क वेब फोरमवर विकली गेली होती.
सायबर फ्रॉड्समध्ये वाढ
भारतात सायबर आर्थिक फसवणूक झपाट्यानं वाढत आहे. ६ फेब्रुवारी रोजी लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार, २०२३ मध्ये आर्थिक सायबर फसवणुकीची एकूण १.१३ मिलयन प्रकरणं नोंदवण्यात आली होती. आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी गृह मंत्रालयाने 'इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर' अंतर्गत 'सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीम' स्थापन केली आहे. गेल्या वर्षी आर्थिक सायबर फसवणुकीच्या निम्म्या प्रकरणांची नोंद पहिल्या पाच राज्यांमध्ये झाली होती. जवळपास २००,००० प्रकरणांसह उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. यानंतर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हरियाणा यांचा क्रमांक येतो.