नवी दिल्ली: गेल्या सहा वर्षांत देशात इंटरनेट स्वस्त झालं. त्यामुळे डेटाचा वापर कैकपटीनं वाढला. याच कालावधीत इंटरनेटचे दरदेखील कमी झाले. देशात महागाई वाढत असताना इंटरनेट मात्र स्वस्त झालं. २०१४ च्या तुलनेत २०२० मध्ये डेटा ९६ टक्क्यांनी स्वस्त झाला. सहा वर्षांत डेटाचा वापर ४३ पटींनी वाढला असताना त्याच कालावधीत डेटासाठी मोजावी लागणारी किंमत मात्र २४ पटींनी कमी झाली आहे.२०१४ मध्ये देशातील इंटरनेटचा वापर कमी होता. एक वापरकर्ता सरासरी ३.२ जीबी डेटा वापरायचा. एक जीबीसाठी त्यावेळी २६९ रुपये मोजावे लागायचे. २०२० मध्येच एक जीबीसाठी केवळ १०.९ रुपये मोजावे लागले. तर याच कालावधीत इंटरनेटचा वापर सुस्साट वेगानं वाढला. २०२० मध्ये एका वापरकर्त्यानं सरासरी १४१ जीबी डेटाचा वापर केला. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये डेटाचा वापर २० टक्क्यांनी वाढला. कोरोना संकट आणि त्यामुळे करावा लागणारा लॉकडाऊन यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झालं. शाळेचे वर्गदेखील ऑनलाईन सुरू झाले. वैद्यकीय क्षेत्रातील काहींनीदेखील ऑनलाईन काम करणं पसंत केलं. त्यामुळे डेटाचा वापर वाढला. कोरोना संकटात अनेक जण घरातूनच काम करत असल्यानं डेटाचा वापर वाढला. मात्र वर्षभराच्या कालावधीच डेटाचं मूल्य मात्र कमी झालं. २०१९ मध्ये एक जीबी डेटासाठी ११.१ रुपये मोजावे लागायचे. २०२० मध्ये एका जीबीसाठी १०.९ रुपये मोजावे लागले. वर्षभराच्या कालावधीत डेटाचा दर २ टक्क्यांनी घसरला, अशी आकडेवारी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियानं (ट्राय) दिली.जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील डेटाची किंमत अतिशय कमी आहे. अमेरिकेत एक जीबी डेटासाठी ५३१ रुपये मोजावे लागतात. ब्रिटनमध्ये एक जीबीसाठी २८६ रुपये खर्च करावा लागतो. एक जीबी डेटासाठी खर्च करावी लागणाऱ्या रकमेची जागतिक सरासरी काढल्यास ती ३६६ रुपये इतकी आहे. या तुलनेत भारतात डेटा अतिशय स्वस्त आहे. २०२० मध्ये भारतातील इंटरनेट कनेक्शन्सची संख्या ७५ कोटींच्या पुढे गेली. यातील बहुतांश कनेक्शन्स शहरी भागांत आहेत.
सहा वर्षांत सगळंच बदललं! डेटाच्या वापरात ४३ पटींनी वाढ; किमतीत ९६ टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 8:28 AM