- उमेश शर्मा
(चार्टर्ड अकाउंटंट)
अर्जुन: कृष्णा, आयकर कायद्यामध्ये रोख व्यवहारांसंबधीत महत्त्वपूर्ण तरतुदी कोणत्या आहेत ?
कृष्ण: आयकर कायद्यामध्ये रोख व्यवहारांसंबंधीत महत्त्वपूर्ण तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
1. खर्चासाठी एका व्यक्तीला एका दिवसात रु.10 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम दिली असेल तर त्या खर्चाची वजावट मिळणार नाही.
2. मालमत्तेच्या संपादनासाठी जर रु. 10 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम दिली असेल तर अशा मालमत्तेवर घसारा मिळणार नाही.
3. आरोग्य विम्याचे पेमेंट जर रोखीत केले असेल तर आयकरात वजावट मिळणार नाही.
4. रु. 2 हजारपेक्षा जास्त रोख रक्कम देणगी दिल्यास त्याची वजावट मिळणार नाही.
5. कोणत्याही करदात्याने 20 हजारांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज किंवा ठेव रोखीत स्वीकारू नये, तसेच परतफेडही करू नये. अन्यथा 100 टक्के दंड आकारण्यात येतो.
6. कोणत्याही करदात्याने रु. 2 लाखांपेक्षा जास्त एका व्यक्तीकडून, एका दिवसात किंवा एकाच व्यवहाराच्या संदर्भात रोखीत घेऊ नये.
7. बँकेतून रु. 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात काढली गेल्यास 2 टक्के टीडीएस लागू होतो. जर मागील तीन वर्षांचे आयटीआर भरले नसेल तर रु. 20 लाखांवर रोख काढण्यावर 2 टक्के टीडीएस आणि रु. 1 कोटींवर रोख रक्कम काढण्यावर 5 टक्के टीडीएस लागू होतो.
8. एका व्यवसायामध्ये रोख व्यवहार 5 टक्क्यांच्या खाली असेल तर टॅक्स ऑडिट लागू न होण्याची मर्यादा रु. 10 कोटींपर्यंत वाढून जाते.
9. जर करदात्याचे रोख व्यवहार 5 टक्यांपेक्षा कमी असल्यास आर्थिक वर्ष 2023-24 पासून प्रीझमटीव टॅक्सेशनची मर्यादा बिझनेससाठी रु. 3 कोटी आणि प्रोफेशनसाठी रु. 75 लाख असेल.
जर करदात्याच्या हातात कृषी उत्पन्नाची रोख विक्री शेती उत्पन्न म्हणून दर्शविली गेल्यास त्यावर कोणतीही आकारणी नाही. परंतु जर भागीदाराने रु. 2 लाखांपेक्षा जास्त भांडवल रोख दिले तर त्यावर मात्र दंडाची तरतूद आहे.
Business: रोख व्यवहार करताय? - सावध राहा!
Business: आयकर कायद्यामध्ये रोख व्यवहारांसंबधीत महत्त्वपूर्ण तरतुदी कोणत्या आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 08:21 AM2023-09-11T08:21:06+5:302023-09-11T08:21:28+5:30