मुंबई - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गतही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, अद्यापही लाखो मजूर पायपीट करत गावी जात आहेत. गावाकडे जाताना या मजुरांसोबत दुर्घटनाही घडत आहेत. याबाबत, अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे आणि विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर राज्यातील विविध भागात अडकलेले होते. आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजूर गावी जाताना दिसत आहेत. देशातील विविध रेल्वे स्थानकांवरुन काही ट्रेनही परराज्यात रवाना झाल्या आहेत. तर, काही मजूर बसमधून रवाना होत आहेत. मात्र, अद्यापही मजूर, कामगार वर्गाचे अतोनात हाल सुरुच आहेत. कुणी शकडो मैल पायपीट करत आहे, कुणी अव्वाच्या सव्वा भाडं देऊन जनावरांसारखा ट्रक, टेम्पोनं प्रवास करतान दिसत आहे.
रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ मजूरांचा मृत्यु झाला. पण, तपास सुरु आहे. मात्र, या घटनेच्या पाठिमागील विदारक सत्य आपल्याला माहिती आहेच. रोजगार गेल्यामुळे तेही लाखो मजूरांप्रमाणेच उपाशी होते, म्हणूनच शेकडो मैल अंतर कापून आपल्या घरी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. लॉकडाऊन असल्याने रुळावरुन रेल्वे धावणार नाही, असे त्यांना वाटले होते. कोरोना महामारीला थांबविण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं आहे. पण, देशातील हे मृत्यू अक्षम्य अन् त्रासदायक आहेत, असे अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे.
अक्षम्य या शब्दाचा उल्लेख मी सहज करत नसून दोष आपलाच आहे. आपण जो समाज निर्माण केला, त्याचा आहे. मोठ्या संकटातील ही त्रासदायक पीडा आहे. मात्र, अतिशय गरजवंत आणि गरिब नागरिकांनाचा याचा त्रास सहन करावा लागत आहे, असेही प्रेमजी यांनी एका लेखातून म्हटले आहे. तसेच, काही राज्य सरकार कंपन्यांसोबत मिलीभगत करुन कामगार कायद्यात बदल करत आहे. कामगारांच्या हिताचे कायदे मोडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही प्रेमजी यांनी म्हटले आहे.