सोपान पांढरीपांडेनागपूर : सहयोगी बँकांच्या विलीनीकरणामुळे स्टेट बँकेचे थकीत कर्ज वाढले. ते स्वाभाविकच होते, पण त्यामुळे फारशी चिंता नाही. कारण थकीत कर्ज आटोक्यात आले आहे, अशी कबुली स्टेट बँक आॅफ इंडिया अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘लोकमत’कडे दिली.स्टेट बँकेमध्ये या वर्षी स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ पतियाला, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर व स्टेट बँक आॅफ हैद्राबाद या पाच बँका विलीन झाल्या, यासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात होता. त्या म्हणाल्या की, स्टेट बँकेचे संपत्ती मूल्य ३७ लाख कोटी रुपये आहे व थकीत कर्ज १.४५ लाख कोटी आहे. विलीनीकरणापूर्वी स्टेट बँकेचे थकीत कर्ज एक लाख कोटी होते, ते वाढले असले, तरी फार मोठा फरक पडेल असे नाही, असा आत्मविश्वास भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.गेल्या वर्षी आलेल्या ईन्सॉलव्हन्सी आणि बँकरप्सी कोडमुळे (आय अँड बी कोड) वित्तीय संस्थासाठी कर्जवसुलीत मदत होईल का? या प्रश्नावर भट्टाचार्य म्हणाल्या की, कर्जवसुली करण्यासाठीच ही व्यवस्था केली आहे. त्यामुळे कर्जवसुलीत नक्कीच मदत होणार आहे. कर्जवसुलीसाठी स्टेट बँकेने मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आय अँड बी कोडमध्ये (नादारी व दिवाळखोरी कोड) वित्तीय संस्थेला कर्जदार कंपनी गुंडाळण्यासाठीचा अर्ज नॅशनल कंपनी लॉ ट्रॅब्युनलकडे करता येतो. ट्रॅब्युनल मग कंपनीवर प्रशासक नेमू शकते. या व्यवस्थेमुळे कंपन्या छुप्या पद्धतीने बळकावण्याचे प्रकार वाढतील, अशी भीती कॉर्पोरेट जगतात पसरली आहे. तसे होईल का? या प्रश्नावर भट्टाचार्य यांनी ट्रॅब्युनलच्या देखरेखीखाली सर्व घडामोडी होणार असल्याने कंपन्या बळकावल्या जाण्याची शक्यता नाही, असे उत्तर दिले.श्रीमती भट्टाचार्य यांनी स्टेट बँकेत २२व्या वर्षी प्रोबेशनरी आॅफिसर म्हणून १९७७ साली प्रवेश केला. गेल्या ४० वर्षांत त्या बँकेच्या सर्वोच्च पदी स्वकर्तृत्वाने पोहोचल्या आहेत. १९९६ ते २००० या कालावधीत त्यांनी स्टेट बँकेच्या न्यूयॉर्क शाखेच्या प्रमुख म्हणूनही काम केले आहे. विलीनीकरणानंतर स्टेट बँकेचे संपत्ती मूल्य ३७ लाख कोटी झाले आहे, कर्मचारी संख्या २ लाख ९ हजार, तर शाखा २४,००० झाल्या आहेत.
थकीत कर्जात वाढ, पण आटोक्यात : भट्टाचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:20 AM