मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीला १४००० कोटी रुपयांची संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. यातील निम्मी रक्कम कंपनीचे विद्यमान दोन प्रवर्तक गुंतवू शकतात. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये आदित्य बिर्ला ग्रुप आणि यूकेस्थित व्होडाफोन पीएलसी यांचा समावेश आहे. व्होडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. परंतु कर्जामुळे तिची स्थिती खराब आहे.
सद्यपरिस्थितीमुळे व्होडाफोन आयडिया अद्यापही 5G सेवा सुरू करू शकलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं सरकारकडे एक प्लॅन सोपवला आहे. यानुसार, दोन्ही प्रवर्तक लवकरच कंपनीमध्ये २००० कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. या बातमीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी आली. कामकाजादरम्यान सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वाढून ८.४८ रुपयांवर पोहोचला.
सरकारनं दूरसंचार कंपन्यांसाठी सप्टेंबर २०२१ रिव्हायव्हल पॅकेज आणलं होतं. तेव्हापासून, प्रवर्तकांनी व्होडाफोन आयडियामध्ये ५ हजार कोटी रुपयांची नवीन इक्विटी गुंतवणूक केली आहे. या योजनेनुसार, प्रवर्तक कंपनीला ७ हजार कोटी रुपये उभारण्यास मदत करतील. सूत्रांच्या मते, ही रक्कम बाह्य गुंतवणूकदारांकडून थेट इक्विटी किंवा कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर्सच्या स्वरूपात असू शकते. आदित्य बिर्ला समूहाचा कंपनीत १८ टक्के हिस्सा आहे. कंपनीवर बँकांचं एकूण कर्ज ४० हजार कोटी रुपयांवरून १२ हजार कोटी रुपयांवर आले आहे. विश्लेषकांच्या मते, २०२६ पर्यंत कंपनीला २५ हजार कोटी रुपयांच्या रोख तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो.
५ जी सेवारिलायन्स जिओ आणि एअरटेलनं देशात 5जी सेवा सुरू केली आहे. पण व्होडाफोन आयडियानं अद्याप याची सुरुवात केलेली नाही. कंपनीला त्यांच्या 4G सेवेसाठीही संघर्ष करावा लागत आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. फेब्रुवारीमध्ये, कंपनीच्या 4G युझर्सची संख्या १३ लाखांनी कमी झाली. ही गेल्या २१ महिन्यांतील सर्वात मोठी घट आहे. फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारनं कंपनीवरील १६,१३३ कोटी रुपयांची थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित केली होती.