अकोला : विदर्भाच्या जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे सातत्याने चिंताजनक निष्कर्ष समोर येत असून, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने भर दिला आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या शेतावर शेती दिन घेण्यात येत असून, सोयाबीनमधील कमी झालेले गंधक, दुय्यम अन्नद्रव्याचे प्रमाण भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विदर्भातील जमिनीमध्ये ९७.३६ टक्के नत्राची कमतरता आढळून आली आहे. स्फुरद ४९.४०, गंधक २०.४५ व जस्त ५०.७७ टक्के आढळून आले आहे. त्याचप्रमाणे लोह, पालाश, बोरॉन या अन्नद्रव्यांचे प्रमाण घटल्याचे आढळले आहे. हे प्रमाण या आधीच्या अभ्यासातील प्रमाणापेक्षा कमी झाले आहे. दोन वर्षात कोणताच बदल झाला नसून, खताच्या वापरात आणखी वाढ झाली आहे. त्यासाठी जमिनीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असून, अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार खतांचा योग्य वापर करावा लागणार आहे. भौगालिक स्थळ प्रणालीवर आधारित माहितीचा वापर पिकांच्या शाश्वत उत्पादकतेसाठी करावा लागणार आहे. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतासोबतच संतुलित खत व्यवस्थापन करावे लागणार आहे. सोयाबीन पिकातील गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिके, प्राणी व मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेती दिनाचे कार्यक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येत असून, शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील चिखली या गावी शेती दिन घेण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र करडा व डॉ. पंदेकृविच्यावतीने शेतकऱ्यांना गंधक व दुय्यम अन्नद्रव्याचे सोयाबीन पिकावरील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या संदर्भातील माहिती पत्रके शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. शेतकऱ्यांनी संतुलित खतांचा वापर करावा, हा या मागील उद्देश आहे. संतुलित गंधकाच्या वापरामुळे पिकांची योग्य वाढ, शेंगा व दाणे भरल्याचे शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
सोयाबीन पिकात गंधकाचा वापर वाढविण्याचा निर्णय
By admin | Published: September 20, 2015 11:01 PM