लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतामधील परस्पर निधी (म्युच्युअल फंड)च्या व्यवस्थापनाखालील निधीमध्ये जून तिमाहीच्या अखेरीस आठ टक्क्यांनी घट झाली आहे. ही मालमत्ता आता सुमारे २५ लाख कोटी रुपयांवर आलेली आहे.
असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) या संस्थेने जून तिमाहीच्या अखेरची भारतातील परस्पर निधींच्या व्यवस्थापनाखालील निधीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये या तिमाहीत हा निधी आठ टक्क्यांनी घटला असल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत परस्पर निधींच्या व्यवस्थापनाखालील निधी २४.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या तिमाहीमध्ये तो २७ लाख कोटी रुपये होता. मागील वर्षी एप्रिल ते जून तिमाहीमध्ये हा निधी २५.५ लाख कोटी रुपयांवर होता.
घट होण्याची ही आहेत कारणे
परस्पर निधींच्या इक्विटी आणि डेट या दोन प्रमारच्या योजनांमधून प्रामुख्याने गुंतवणूकदार बाहेर पडलेले दिसून येत असून, त्यामुळे निधी कमी झाला आहे. या तिमाहीमध्ये निफ्टीमध्ये सुमारे २४ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गुंतवणूकदारांनी बाहेर पडणेच पसंत केलेले दिसते. याशिवाय कोरोनाच्या साथीमुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे नोकऱ्यांबाबत निर्माण झालेली अस्थिरता, पगारामध्ये झालेली कपात याचाही फटका बसल्याने गुंतवणूक काढून घेतली गेली.