लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे गेल्या वर्षातील अखेरच्या महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाई दरात घट नाेंदविण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये ग्राहक मूल्य निर्देशांक ४.६ टक्के नाेंदविण्यात आला. मात्र, तांदूळ, डाळी तसेच खाद्यतेलाच्या किमतीत माेठी वाढ झाल्यामुळे निर्देशांकातील आणखी घसरणीला ब्रेक लागला.
डिसेंबरमध्ये कांदा, लसूण, अद्रक, भाजीपाला इत्यादींसह जवळपास सर्वच खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या. त्यामुळे महागाई कमी हाेण्यास मदत झाली आहे. काेराेनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात हा निर्देशांक सहा टक्क्यांच्या वर पाेहाेचला हाेता. लाॅकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणल्यानंतर महागाई कमी हाेण्यास मदत झाली. या निर्दशांकातील कांद्याचा निर्देशांक ४६.५ टक्क्यांनी घसरला. लसणाचा १९.१ आणि अद्रकचा निर्देशांक २४.५ टक्क्यांनी घसरला. या कृषीमालाच्या किमतींमध्ये डिसेंबरमध्ये माेठी घट दिसून आली. देशात कांद्याचे दर डिसेंबर २०१९ मध्ये १०० रुपये प्रतिकिलाेहून अधिक झाले हाेते. त्या वेळी अवकाळी पावसामुळे कांद्याचे माेठे नुकसान झाले हाेते. यावेळी मात्र परिस्थिती दिलासादायक आहे. याशिवाय फुलकाेबीचे दरही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कमी हाेते.
भाजीपाल्याचे दरही घटलेडिसेंबरमध्ये वांगी, गाजर, पत्ताकाेबी, मुळा या भाजीपाल्यासह फळांच्याही किमतीत घसरण झाली हाेती. त्यामुळे अन्नधान्याशी निगडित असलेल्या महागाई निर्देशांकातही घट नाेंदविण्यात आली. या जिन्नसांचा ग्राहक मूल्य निर्देशांकात जवळपास ४७ टक्के वाटा असताे. त्यामुळे निर्देशांकात घट हाेण्यास मदत झाली आहे. बटाटा आणि कांद्याच्या किमतीत पुढील महिन्यामध्ये घसरण हाेण्याचा अंदाज आहे. तसेच या वर्षी डाळीच्या किमतीत काही महिन्यांमध्ये वाढ हाेण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.