Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वीस बँकांतील भारतीयांची ‘माया’ वर्षभरात आटली

स्वीस बँकांतील भारतीयांची ‘माया’ वर्षभरात आटली

वर्ष २०२३मध्ये ९,७७१ कोटी रुपये जमा, ठेवी ७० टक्क्यांनी घटल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:44 AM2024-06-21T08:44:44+5:302024-06-21T08:45:10+5:30

वर्ष २०२३मध्ये ९,७७१ कोटी रुपये जमा, ठेवी ७० टक्क्यांनी घटल्या.

Decline in Indian money in Swiss banks | स्वीस बँकांतील भारतीयांची ‘माया’ वर्षभरात आटली

स्वीस बँकांतील भारतीयांची ‘माया’ वर्षभरात आटली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वीस बँकांत भारतीयांनी ठेवलेला पैसा २०२३ मध्ये ७० टक्के घटून १.०४ अब्ज स्वीस फ्रँक म्हणजेच ९,७७१  कोटी रुपयांवर आला. हा ४ वर्षांचा नीचांक आहे. स्वित्झरलँडची केंद्रीय बँक ‘स्वीस नॅशनल बँके’ने (एसएनबी) जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. 

स्वीस बँकांतील भारतीयांच्या एकूण पैशांत सलग दुसऱ्या वर्षात घसरण झाली आहे. २०२१ मध्ये स्वीस बँकांतील भारतीयांचा पैसा प्रचंड वाढून ३.८३ अब्ज स्वीस फ्रँक झाला होता. हा १४ वर्षांचा उच्चांक होता.  भारतीयांनी स्वीस बँकांत ठेवलेला पैसा रोख रकमेशिवाय रोखे व अन्य वित्तीय साधनांच्या स्वरूपात आहे. काही पैसा थेट स्वित्झरलँडमधील बँकांत ‘ग्राहक ठेव खात्या’त असून, काही पैसा स्वीस बँकांच्या भारतीय शाखांतही आहे. या सर्वच स्वरूपातील रकमेत घसरण झाली आहे. 

असा आहे पैशाचा तपशील
- भारतीयांची स्वीस बँकांतील एकूण रक्कम :  १०३.९८ कोटी स्वीस फ्रँक
- ग्राहक ठेवी : ३१ कोटी स्वीस फ्रँक. (२०२२ मध्ये हा आकडा ३९.४ कोटी स्वीस फ्रँक होता)
- अन्य बँकांच्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवी : ४२.७ कोटी स्वीस फ्रँक (२०२२ मध्ये हा आकडा १११ कोटी स्वीस फ्रँक होता.) 
- न्यास अथवा ट्रस्टच्या ठेवी : १ कोटी स्वीस फ्रँक. (२०२२मध्ये २.४ स्वीस फ्रँक)
- रोखे व अन्य वित्तीय साधने : ३०.२ कोटी स्वीस फ्रँक. (२०२२ मध्ये १८९.६ कोटी स्वीस फ्रँक)

२००६ मध्ये होती सर्वाधिक रक्कम
‘एसएनबी’च्या आकडेवारीनुसार, वर्ष २००६ मध्ये सर्वाधिक ६.५ अब्ज स्वीस फ्रँक इतकी रक्कम भारतीयांनी स्वीस बँकांत ठेवलेली होती. त्यानंतर २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ ही काही वर्षे वगळता इतर सर्व वर्षांत ही रक्कम घटत गेली.

काळ्या पैशाचा खुलासा नाही 
‘एसएनबी’ने जाहीर केलेली ही आकडेवारी भारतीयांनी स्वीस बँकांत ठेवलेल्या एकूण पैशाची आहे. त्यात काळा पैसा किती आहे, याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. याशिवाय, भारतीय आणि अनिवासी भारतीयांनी तिसऱ्या देशातील संस्थांच्या नावे स्वीस बँकांत ठेवलेल्या पैशाचा यात समावेश नाही.

Web Title: Decline in Indian money in Swiss banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.