बाल्टीमोर : कोरोनाच्या साथीने अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात देशातील किरकोळ विक्रीमध्ये १६.४ टक्क्यांची घट झाली आहे. बाजारात खरेदीदार फिरकत नसल्यामुळे डिपार्टमेंटल स्टोअर्सना आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने एक अहवाल प्रसारित केला असून, त्यामध्ये एप्रिल महिन्यातील किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. मार्च महिन्यातील विक्रीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात किरकोळ विक्री १६.४ टक्क्यांनी कमी झाली असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. गेला १२ महिन्यांपैकी किरकोळ विक्री सातत्याने कमी होत असल्याचे अहवालात स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात ही विक्री २१.६ टक्क्यांनी घटली आहे.
१९९२ मध्ये अमेरिकेत मोठी मंदी आली होती. त्याची आठवण सध्याच्या कालखंडात होते आहे. काही अर्थतज्ज्ञांच्या मते यंदाची मंदी ही १९९२ पेक्षाही अधिक प्रमाणात आहे. मार्च महिन्यात किरकोळ विक्रीमधील घट ८.३ टक्के होती. अवघ्या एका महिन्यात ती दुप्पट झाल्याने अर्थतज्ज्ञ चिंतेत पडले आहेत. अमेरिकेत आॅनलाइन खरेदी मात्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचर याच्या विक्रीमध्ये एप्रिल महिन्यात मार्च महिन्यापेक्षा अधिक घट दिसून आली. एप्रिल महिन्यात वाहनांच्या विक्रीत १३ टक्के तर फर्निचरच्या विक्रीत ५९ टक्के एवढी घट झाली. इलेक्ट्रॉनिक वस्तंूच्या विक्रीमधील घट ही ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. अमेरिकेतील रेस्टॉरंटच्या व्यवसायामध्येही ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे बाहेर पडण्यावर आलेले निर्बंंध बघता नागरिकांनी आॅनलाइन खरेदीला प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. विविध ठिकाणी बाजार सुरू झाल्यास दुकानांमधील विक्री वाढू शकेल.
अमेरिकेतील किरकोळ विक्रीत घट; एप्रिल महिन्यात १६ टक्के कमी
बाजारात खरेदीदार फिरकत नसल्यामुळे डिपार्टमेंटल स्टोअर्सना आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:15 PM2020-05-17T23:15:25+5:302020-05-17T23:16:10+5:30