नवी दिल्ली : ट्राफिक जाम, पार्किंगच्या समस्या, अॅप आधारित कॅब्स, आॅनलाइन बुकिंग आणि वेगाने वाढणारे मेट्रोचे नेटवर्क या कारणांमुळे मोठ्या शहरातून कारच्या विक्रीत घट झाली आहे.
मुंबईत कारच्या विक्रीत २० टक्के घसरण झाली आहे. २०१७-१८ मध्ये एकूण ९७,२७४ कारची विक्री झाली. यापूर्वीच्या वर्षात १.२२ लाख कारची विक्री झाली होती.
भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या कार मार्केटमध्ये बंगळुुरूत ११ टक्के घसरण झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या कार मार्केट दिल्लीमध्ये विक्रीत केवळ १.६ टक्के वाढ झाली आहे, ही वाढ फारशी नाही. कारण
२०१६-१७मध्ये काही महिने डिझेलच्या कारवर प्रतिबंध आणल्याने कमी कार विक्री झाल्या. त्यामुळे १.६ टक्के वाढ फार मोठी नाही.
हुंदाई इंडियाचे विक्री आणि विपणन विभागाचे संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, मोठ्या शहरात ओला आणि उबेर यासारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यानंतर शेअर टॅक्सीची पद्धत वाढली आहे, तसेच गुरुग्राम आणि दिल्लीसारख्या रोजगाराचे गड समजल्या जाणाºया शहरात वेगाने मेट्रो नेटवर्क वाढत आहे.
वाहन उद्योगातील वरिष्ठ लोकांचेही असे म्हणणे आहे की, नागरिक दुसरी कार खरेदी करण्याचे नियोजन करताना दिसत नाहीत. पूर्वी महिला घरगुती काम करण्यासाठी वाहनांचा वापर करत होत्या, पण आता त्या आॅनलाइन आॅर्डर देतात किंवा अॅप आधारित कॅब बोलवितात. यात वाहन चालविणे, पार्किंगसाठी जागा शोधणे आणि ट्राफिक जाममध्ये फसणे यापासून सुटका झाली आहे.
टोयोटा किर्लोस्करचे उपकार्यकारी संचालक एन. राजा म्हणाले की, वाहनांच्या साखळ्या असणारे आॅपरेटर्स आणि शेअर टॅक्सी प्लॅटफॉर्मच्या चालकांनी वाहनांची खरेदी कमी केली आहे. याचे कारण असे आहे की, ओला आणि उबेरच्या चालकांचा प्रोत्साहन भत्ता कमी करण्यात आला आहे, याशिवाय जीएसटीचाही परिणाम झाला आहे.
मोठ्या शहरांमध्ये घटली कारची विक्री
ट्राफिक जाम, पार्किंगच्या समस्या, अॅप आधारित कॅब्स, आॅनलाइन बुकिंग आणि वेगाने वाढणारे मेट्रोचे नेटवर्क या कारणांमुळे मोठ्या शहरातून कारच्या विक्रीत घट झाली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:39 AM2018-04-30T01:39:59+5:302018-04-30T01:39:59+5:30